मुंबई : मुंबई कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने गुरुवारी इथिओपिया येथून मुंबईला आलेल्या ४० वर्षीय झांबियन महिलेकडून १८ कोटी किमतीचे ३.५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. या महिलेने अत्यंत चतुराईने प्रवासी ट्रॉली बॅगमध्ये औषधांच्या पाकिटात हे ड्रग्ज लपविले होते. काही दिवसांपूर्वीच एआययूला ही महिला ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे मुंबई विमानतळावर सापळा रचण्यात आला होता. अखेर गुरुवारी या महिलेला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले असून तिच्यावर नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एआययूने याच एका आठवड्यात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, जोहान्सबर्ग ते दोहा मार्गे मुंबईला जाणाऱ्या आई व मुलीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे २५ कोटी किमतीच्या हेरॉईनसह अटक करण्यात आली होती. या घटनेबद्दल एआययूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशिष्ट माहितीच्या आधारे या ४१ वर्षीय परदेशी महिलेला गुरुवारी मुंबई विमानतळावर अडवण्यात आले. यावेळी तपासणीत तिच्याकडे ड्रग्ज आढळले. ती व्यवसाय व्हिसावर भारतात आली आहे. ही महिला झांबिया येथील गरीब कुटुंबातील गृहिणी असून ती पहिल्यांदाच भारतात आली आहे. भारतात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी तिला १ लाख ४७ हजार देण्यात आले होते. या ड्रग्जची आयात भारतात करण्यामध्ये या महिलेसोबत अजून कोण सहभागी आहे व हे ड्रग्स भारतात कोणाकडे देण्यात येणार होते, याची माहिती मिळण्यासाठी एआययूचे अधिकारी आता या महिलेचे फोन कॉल तपासत आहेत. या महिलेला न्यायालयात हजर केले असता शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.