३५ बारबालांसह ५४ जणांना अटक
By admin | Published: May 23, 2015 10:51 PM2015-05-23T22:51:07+5:302015-05-23T22:51:07+5:30
नौपाडयातील ‘आम्रपाली’, ‘शिल्पा’, ‘मुंबई पॅलेस’ आणि राबोडीतील ‘सोनिया इन’ या चार बारमध्ये धाड टाकून ३५ बारबालांसह ५४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : नौपाडयातील ‘आम्रपाली’, ‘शिल्पा’, ‘मुंबई पॅलेस’ आणि राबोडीतील ‘सोनिया इन’ या चार बारमध्ये धाड टाकून ३५ बारबालांसह ५४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांची वैयक्तिक जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.
लेडीज सर्व्हीसच्या नावाखाली तोकड्या कपड्यांमध्ये या बारबाला बारमध्ये थिरकत होत्या. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी त्यांचे बिभत्स चाळेही सुरु होते. नौपाडा पोलिसांनी २१ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ‘आम्रपाली बार अॅन्ड रेस्टॉरन्ट’ मध्ये धाड टाकून मॅनेजर नारायण गौडा, वेटर नितिन सागवेकर, अजय गायकवाड तसेच निशिनकुमार वाडेला आणि नितिन सरदेसाई यांच्यासह सात बारबालांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक यादव अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, खोपट येथील ‘सोनिया इन’ या बारवरही २१ मे रोजी राबोडी पोलिसांनी रात्री १० ते ११.३० वाजताच्या सुमारास धाड टाकली. तिथेही असाच प्रकार सुरु असल्याचे आढळून आल्यामुळे प्रदीप ठाकूर, रमाकांत दास, अजय यादव यांच्यासह चार बारबाला अशा सात जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक उबाळे हे अधिक तपास करीत आहेत. तिसऱ्या घटनेत, शुक्रवारी रात्री शिल्पा बारवर धाड टाकली. तेंव्हा तिथेही असाच प्रकार सुरु असल्याचे आढळून आल्यामुळे १४ महिलांसह मॅनेजर सुरेंद्र साहु, ग्राहक संदीप लंकेश्वर, कल्लन खान, जितेंद्र कपुर, अभिजीत खानविलकर,भुपेंश टाकर यांना अटक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन नौपाडा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोळेकर पुढील तपास करीत आहे.
चौथ्या घटनेत, शुक्रवारी रात्री चरईतील मुंबई पॅलेस बार अॅण्ड रेस्टॉरन्टवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी तिथेही असाच प्रकार सुरु असल्याचे आढळून आल्याने १० महिलांसह सुशील महापात्रा, वेटर नारायण पाडी, कामगार मनकु यादव आणि ग्राहक रमेश परब, सुशांत करण यांना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हादाखर करण्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
४डान्सबारला राज्यात बंदी असतानाही बारमध्ये लेडीज सर्व्हीसच्या नावाखाली गोरखधंदा सुरु आहे.
४ जास्त पैशासाठी बारमालक शासन आदेशाची पायमल्ली करीत
आहेत.