मनीषा म्हात्रे मुंबई : मंत्रालयातील बोगस लिपीक भरती रॅकेट प्रकरण ताजे असतानाच मंत्रालयातील कर्मचारी, पोलिसांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याच्या नावाखाली कर्मचारी आणि पोलिसांसह एकूण ३५ जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
वरळी सी फेस येथील शासकीय निवासस्थानात राहणारे संजय नरसाळे (५१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. भांडुपला राहणाऱ्या ललीत विष्णू भालेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०१७ रोजी कांजूरमार्ग येथील अर्चित एन्टरप्रायझेसचा व्यवस्थापक म्हणून भालेकरची मंत्रालयात ओळख झाली. भालेकरने एक लाख रुपयाला पाच हजार किंवा सहा हजार रुपये दरमहा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, त्यांनी ही गुंतवणूक केली. त्यांनी ४ लाखांची गुंतवणूक केली. त्यांच्यासह मंत्रालयातील आणखीन ३५ जणांनी यामध्ये गुंतवणूक केली.सुरुवातीला पैसे मिळत होते. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. यामध्ये जवळपास १ कोटी २८ लाख ३६ रुपयांना गंडविण्यात आले आहे. त्यानंतर, पैसे देणे बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. अखेर, यात फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
गुन्हा दाखल गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.- नीलेश बागुल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मरीन ड्राइव्ह पोलिस ठाणे
एकच हप्ता मिळाला... अन् ललित हा मंत्रालयात येऊन त्याच्या ऑफर सांगत असे. आम्हीही त्याच्या या जाळ्यात अडकलो. यामध्ये २०१७ मध्ये गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर त्याने पैसे देणे बंद केले. त्याच्याकडे गुंतवणूक केलेली मुद्दल परत देण्यास सांगितले. सुरुवातीला आज - उद्या करत कोरोना आला. त्यामुळे प्रकरण लांबले. त्यानंतर, सुरुवातीला कल्याणला तक्रार दिली. त्यानंतर, डोंबिवली करत हे प्रकरण मरीन ड्राइव्हमध्ये दाखल झाले. या प्रक्रियेत गुन्हा दाखल होण्यास उशीर झाला.- तक्रारदार, मंत्रालयीन कर्मचारी
ऑफर काय होती?१ लाखावर महिन्याला ५ ते ६ हजार परतावा
कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही अडकलेयामध्ये कर्मचाऱ्यांबरोबर नातेवाईकही अडकले आहेत. त्यांनीही यामध्ये गुंतवणूक केली. अनेकांनी त्यांची आयुष्यभराची जमापूंजी यात गुंतवली आहे.