मुंबई सुशोभीकरणाची ३५ टक्के कामे बाकी! मेपर्यंत कामे उरकण्याचे पालिकेसमोर उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:40 AM2023-04-12T09:40:16+5:302023-04-12T09:40:26+5:30
मुंबईचा कायापालट करण्यासाठी पालिकेने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे.
मुंबई :
मुंबईचा कायापालट करण्यासाठी पालिकेने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेने या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. मुंबई सुशोभीकरणाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून ३५ टक्के काम अद्यापही बाकी आहे. मेपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे.
मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पालिकेने हजारो कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या अंतर्गत पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती, पदपथाचे सुशोभीकरण, भिंतींना रंगरंगोटी अशी विविध कामे केली जाणार आहेत. या कामासाठी स्वतंत्र निविदा काढल्या जात आहेत.
या कामांसाठी १ हजार ७२९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून डिसेंबर २०२२ पर्यंत किमान ५० टक्के कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने गाठले आहे तसेच प्रत्येक प्रभागासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २४ विभागांच्या स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र ही प्रक्रिया करताना अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप भाजपने केला होता. याच आरोपामुळे अंधेरी आणि मालाडमधील सुशोभीकरणाच्या कामांच्या निविदा रद्द करण्याची वेळ पालिकेवर आली होती.