Join us

मेट्रोसिटीतील ३५ टक्के विद्यार्थी ‘फेस टू फेस’

By admin | Published: June 28, 2015 1:11 AM

सोशल नेटवर्किंगचे जाळे दिवसेंदिवस पसरत चालल्याने एकाच घरातील व्यक्तीही ‘व्हर्च्युअली’ कनेक्ट असल्याचे दिसून येते.

मुंबई : सोशल नेटवर्किंगचे जाळे दिवसेंदिवस पसरत चालल्याने एकाच घरातील व्यक्तीही ‘व्हर्च्युअली’ कनेक्ट असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच एका सर्वेक्षणातून मेट्रोसिटीतील केवळ ३५.९ टक्के तरुणाईच ‘फेस टू फेस’ संवाद साधत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केवळ स्मार्ट फोन्स, गॅझेट्स आणि लॅपटॉप्सच्या युगामुळे संवादांतील दरी वाढत चालली आहे.भारतातील ८५ टक्के विद्यार्थी व्हर्च्युअल संवाद साधत असल्याचे समोर आले आहे. तर २४.५ टक्के विद्यार्थी सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात असे स्पष्ट झाले आहेत. ‘इ-मार्केटर’च्या संशोधनात्मक संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणात देशातील मुंबई, बंगळुरू, नागपूर, पुणे, अहमदाबाद, भुवनेश्वर, चेन्नई, कोचीन, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, लखनऊ अशा मेट्रोसिटींतील १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.या सर्वेक्षणानुसार, फेसबुक, टिष्ट्वटर अशा सोशल साइट्सच्या माध्यमातून १३.५ टक्के आणि व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप, आयएम अशा अ‍ॅप्सच्या साहाय्याने ११.३ टक्के तरुणाई चॅटिंग करते. सोशल साइट्सच्या मागोमाग २६.३ टक्के तरुणाई फोनकॉल्सच्या साहाय्याने एकमेकांशी संवाद साधते.फेसबुकने सोशल साइट्सच्या स्पर्धेत आघाडी घेतली असून ८९ टक्के विद्यार्थी याचा वापर करतात. तर गुगल प्लसचा ६४.४ टक्के, टिष्ट्वटर ४३.७ टक्के आणि व्हॉट्सअ‍ॅप ५७.९ टक्के वापर करतात. एकंदरीत, या सर्वेक्षणाच्या अभ्यासाअंती एकमेकांशी संवाद खुंटत असून दिवसेंदिवस ‘व्हर्च्युअल’ संवाद वाढल्याचे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)