Join us

३५ सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात, भर समुद्रात भारतीय नौदलाची चमकदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 6:05 AM

सोमालियाच्या किनाऱ्यावरून निघालेले एमव्ही रुएन या जहाजाचे अरबी समुद्रात सशस्त्र सोमालियन चाच्यांनी अपहरण केले.

मुंबई : भर समुद्रात तब्बल ४० तास समुद्री चाच्यांशी दोन हात करत त्यांना अटक करणारे भारतीय नौदलाचे आयएनएस कोलकाता हे जहाज शनिवारी मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल झाले. त्यानंतर लगेचच जहाजातील ३५ सोमालियन चाच्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

सोमालियाच्या किनाऱ्यावरून निघालेले एमव्ही रुएन या जहाजाचे अरबी समुद्रात सशस्त्र सोमालियन चाच्यांनी अपहरण केले. यासंदर्भात भारतीय नौदलाला सूचित करण्यात आले. त्यानुसार १५ मार्च रोजी आयएनएस कोलकाता या जहाजाने एमव्ही रुएनवरील सोमालियन चाच्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, उत्तरादाखल चाच्यांनी नौदलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४० तास ही चकमक सुरू होती.

या कारवाईत नौदलाचे आयएनएस सुभद्रा हे जहाजही सहभागी झाले. अखेरीस अपहृत जहाजावर नियंत्रण मिळविण्यात नौदलाला यश आले. त्यानंतर जहाजावरील सर्व सोमालियन चाच्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व चाच्यांना घेऊन आयएनएस कोलकाता जहाज शनिवारी मुंबईच्या किनाऱ्यावर आले. 

ऑपरेशन संकल्पअरबी समुद्रातील ही कारवाई म्हणचे ‘ऑपरेशन संकल्प’चा एक भाग होती. समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांचे समुद्री चाच्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी भारतीय नौदलाने अरबी समुद्र आणि एडनचे आखात या ठिकाणी खास जहाजे तैनात केली आहेत. १४ डिसेंबर २०२३ पासून सुरू असलेल्या या मोहिमेला शनिवार, २३ मार्च रोजी १०० दिवस पूर्ण झाले. या कालावधीत भारतीय नौदलाने अपहरणाच्या १८ घटनांना प्रतिसाद देत कारवाया केल्या. यात पाच हजारांहून नौसैनिक सहभागी झाले होते.

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबई