दोन मिनिटांत ३५ हजार दे, नाहीतर दर मिनिटाला ५ हजार वाढतील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:01 AM2023-02-14T06:01:40+5:302023-02-14T06:02:14+5:30
कस्टम अधीक्षकाची प्रवाशाकडे मागणी, सीबीआयकडून मुंबईत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशातून येणारा प्रत्येक प्रवासी चोर-लुटारू आहे आणि त्याने आणलेली चीजवस्तू चोरीचीच आहे, अशा माजातून विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्याने प्रवाशाची लुटमार केल्याचा प्रकार नुकताच मुंबई विमानतळावर उघडकीस आला आहे.
एखादा सरकारी अधिकारी सामान्य माणसाला आपल्या पदाची ताकद दाखवत त्याच्याकडून पैसे कसे उकळतो त्याचा हा खुमासदार आणि तितकाच घृणास्पद मासला...
अधिकारी - तू दुबईतून आलास ना, गळ्यातली सोन्याची चेन अवैधरीत्या आणली आहेस. त्याचे शुल्क तुला भरावे लागेल.
प्रवासी - ही सोन्याची चेन मी वैयक्तिक वापरासाठी आणली आहे. त्याची किंमत दीड लाख रुपये आहे. त्यावर जे शुल्क येईल ते मी भरेन.
अधिकारी - ५५ हजार रुपयांचे शुल्क आणि दंड असे पैसे भर.
(मग त्या प्रवाशाला एका रूममध्ये त्या अधिकाऱ्याने दीड तास बसवून ठेवले आणि तू तस्करी केली आहेस. तुला मोठी शिक्षा भोगावी लागेल. असे सांगत तो अधिकारी बराच वेळ गायब झाला आणि पुन्हा अर्ध्या तासाने त्या प्रवाशाकडे परत आला.)
प्रवासी - माझ्याकडे पावती आहे सर...
अधिकारी - ते जाऊ दे. शुल्क भरण्याची गरज नाही. त्याचे मी बघतो. पण इथून बाहेर पडायचे असेल तर मला ३५ हजार रुपये आत्ता कॅशमध्ये दे.
प्रवासी - तेवढे पैसै आत्ता माझ्याकडे नाहीत सर.
अधिकारी - एक काम कर, दोन नंबर तुला देतो. त्यावर पैसे जी-पे कर. (प्रवासी विचारात पडला)
अधिकारी - दोन मिनिटांत पैसे दे, नाहीतर पुढच्या प्रत्येक मिनिटासाठी ५ हजार जास्त भरावे लागतील.
प्रवासी - द्या नंबर, पण ३५ नाही ३० हजारच आत्ता देऊ शकतो.
अधिकारी - ठीक आहे.
फिल्मी वाटावा अशा या संवादातील खलनायक अर्थात कस्टम अधीक्षकाचे नाव आहे आलोक कुमार. दुबईहून आलेल्या या प्रवाशाला दीड तास मानसिक त्रास देऊन त्याने अखेर त्याच्याकडून तीस हजार रुपये उकळलेच.
विमानतळाबाहेर पडल्यानंतर त्या प्रवाशाने मग सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली. आलोक कुमारने ज्या दोन मोबाइल क्रमांकावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले त्यापैकी १७ हजार रुपये प्रशांत आंबेडे याच्या नावावर तर १३ हजार रुपये संजय जोशी नावाच्या जी-पे खात्यावर ट्रान्स्फर झाले आहेत.
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशाच्या दाव्यातील तथ्याची पडताळणी करत आलोक कुमारविरोधात नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
(अधिकाऱ्याने दिलेल्या एका क्रमांकावर १७ हजार आणि दुसऱ्या क्रमांकावर १३ हजार रुपये त्या प्रवाशाने जी-पे केले. मग तो प्रवासी मुंबई विमानतळावरून बाहेर पडला.)