३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By मनीषा म्हात्रे | Published: November 20, 2024 05:43 AM2024-11-20T05:43:49+5:302024-11-20T05:45:04+5:30
पाच प्रादेशिक विभागांच्या पाच अप्पर पोलिस आयुक्तांसह २० पोलिस उपायुक्त, ८३ सहायक पोलिस आयुक्त आणि दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात आहेत.
मनिषा म्हात्रे, मुंबई
Maharashtra Election Voting 2024: विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि २५ हजारांहून अधिक अंमलदार असा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईत एकूण ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ४,४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी मतदान केंद्रे, अतिमहत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. पाच प्रादेशिक विभागांच्या पाच अप्पर पोलिस आयुक्तांसह २० पोलिस उपायुक्त, ८३ सहायक पोलिस आयुक्त आणि दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात आहेत.
साध्या गणवेशात वॉच
संवेदनशील ठिकाणी एसएसटी, एफएसटीसोबत २६ केंद्रीय सुरक्षा दले आणि राज्य सुरक्षा दले (सीएपीएफ / एसएपी) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून साध्या वेशात सर्व घडामोडींवर वॉच ठेवण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.
बंदोबस्ताचे नियोजन
महत्त्वाच्या ठिकाणी तीन दंगल नियंत्रण पथके (आरसीपी) तैनात करण्यात आली आहेत. तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे १४४ अधिकारी आणि एक हजाराहून अधिक पोलिस अंमलदार बंदोबस्तावर असतील. चार हजारांहून अधिक गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जवान तैनात करण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबईत पोलिसांनी रोख रक्कम, अंमली पदार्थ असा सुमारे १७५ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी ४,४९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
...तर कॉल करा
नागरिकांनी आदेशाचे पालन करून सहकार्य करावे. तसेच कोणत्याही मदतीसाठी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १००/१०३/११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
शांततेत मतदान करा
मतदानाच्या दिवशी सर्व मुंबईकरांनी आपला मतदानाचा हक्क, कर्तव्य बजवावे आणि शांततेत मतदान करावे, असे आवाहन मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले.