आरटीओने केल्या ३५ गाड्या जप्त
By admin | Published: July 16, 2014 03:48 AM2014-07-16T03:48:22+5:302014-07-16T03:48:22+5:30
वैधता प्रमाणपत्रांची मुदत संपल्यानंतरही तशीच वाहने हाकणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मागील पंधरा दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे
नवी मुंबई : वैधता प्रमाणपत्रांची मुदत संपल्यानंतरही तशीच वाहने हाकणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मागील पंधरा दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत २0७ वाहनांची झाडाझडती घेण्यात आली आहे. तर ३५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
वाहन नोंदणीच्या वेळी वाहनांना दोन वर्षाच्या मुदतीचे वैधता प्रमाणपत्र दिले जाते.मात्र मुदत संपल्यानंतर प्रत्येक वर्षाला त्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक असते. परंतु अनेक वाहनधारक या नियमाला फाटा देत सर्रासपणे वाहने चालविताना दिसून येतात. याची गंभीर दखल राज्य परिवहन विभागाने घेतली आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार आरटीओने १ जुलैपासून अशा वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात ट्रक, टेम्पो, खासगी बसेस, रिक्षा व टॅक्सी या वाहनांचा समावेश आहे. आतापर्यंत २0७ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४३ वाहनांच्या वैधता प्रमाणपत्रांची मुदत संपल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ९ लाख २0 हजार ४00 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत तब्बल ३५ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली.
ही मोहीम जुलैअखेरपर्यंत चालणार असून याअंतर्गत वाहनांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात परिवहन उपक्रमांच्या गाड्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे धायगुडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)