Join us

सिनेटसाठी ३५% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:08 AM

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट मतदारसंघाची निवडणूक

 मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट मतदारसंघाची निवडणूक रविवारी पार पडली. सिनेटच्या १० जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत एकूण ५३ मतदान केंद्रांवर सुमारे ३५ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या ६८ उमेदवारांमध्ये नेमकी कोण बाजी मारणार हे मंगळवारी २७ मार्च रोजी लागणाऱ्या निकालाने स्पष्ट होईल.मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या १० पदवीधरांच्या जागांसाठी सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका मतदानावर झाला. बहुतेक मतदारांना मतदान नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली नव्हती. तसेच मतदान कुठे होणार याबाबतची आगाऊ माहिती पत्राद्वारे विद्यापीठाने कळविली नव्हती. त्यामुळे अपेक्षित मतदान होऊ शकले नाही, असा आरोप उमेदवारांनी केला आहे.मतदानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मतदान केंद्रावर विशेषकरून युवासेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अभाविपचे कार्यकर्तेे आपआपल्या उमेदवारांसाठी प्रचार करत होते. प्रामुख्याने या तीन संघटनांमध्ये अटीतटीची लढत मानली जात आहे. तरी या तीन संघटनांपैकी कोण बाजी मारणार हे मंगळवारच्या निकालानंतर स्पष्ट होईल.