औरंगाबाद - शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री सध्या मुंबईतील दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येकजण आपल्या-आपल्या मतदारसंघातून शिवसैनिकांना मुंबईत घेऊन येण्याची तयारी करत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे. त्यातच, आता एसटी महामंडळही मेळाव्यासाठी कामाला लागले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदारसंघातून तब्बल ३५० एसटी महामंडाळाच्या बसेस मुंबईला येणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे.
आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेची अडचण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्ग काढत आपल्या रिक्षात ५० आमदार घेऊन शिवसैनिकांना न्याय दिला. सर्वसामान्य माणूस व शेतकरी यांना वेळ देणारा असा मुख्यमंत्री आपण ४० वर्षांत पाहिला नाही. जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल शहर विकासासाठी मागतील तेवढा निधी त्यांना देऊ. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सत्तार यांनी हिंदू गर्व गर्जनाच्या सभेत बोलताना केले होते. त्यानंतर, आज त्यांच्या सिल्लोड आगारात महामंडळातील अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत यंदा बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड एस टी बस आगराकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून मेळाव्यासाठी सिल्लोड एस टी आगाराचे सर्व अधिकारी कर्मचारी व अधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. सिल्लोड आगारसह परिसरातील इतर आगारातून बसेस मुंबईला मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत, सिल्लोडचे आगारप्रमुख आनंद चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.
नांगरे पाटलांनी शिवाजी पार्क मैदानावर केली पाहणी
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली. दसऱ्याला दोन ठिकाणी मेळावे होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली.