श्रीकांत जाधव
मुंबई - महाज्योती अधिछात्रवृत्तीच्या जागा कमी केल्याने ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांनी वीस दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण धरले आहे. अशात विभागाकडून माहिती मिळवली असता महाज्योतीचे ३५० कोटींचा निधी शिल्लक असल्याची माहिती विद्यार्थ्यानाच्या हाती लागली आहे. त्यामुळे एवढा निधी शिल्लक असतानाही सरकार आणि ओबीसी नेते विद्यार्थ्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीने केला आहे.
शासनाने महाज्योती अधिछात्रवृत्तीच्या जागा कमी केल्याने ओबीसी विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात ३० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सरकारकडून अद्याप त्याची दखल घेतली जात नसल्याने आक्रमक विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात काळी दिवाळीही साजरी केली. महाज्योती अंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येते. वर्ष २०१९ मध्ये ९५७ विद्यार्थी तर वर्ष २०२२ मध्ये १ हजार २२६ विद्यार्थी संशोधकांना फेलोशिप देण्यात आली. १ जून २०२३च्या अधिछात्रवृत्तीसाठी ५० जागा विरोधात राज्यभरातील विद्यार्थांनी विरोध केला. अखेर सरकारने जागा वाढवून २०० केल्या आहेत. तरी सुद्धा या २०० जागा एकूण लाभार्थी जातींची संख्या ४१२ असून लोकसंख्येला पूरक नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आपल्या मागणीसाठी महाज्योती महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष सद्दाम मुजावर, टाटा इन्स्टिट्यूटचे अतुल पाटील, संदीप आखाडे, तनुजा पंडित, वैभव जानकर उपोषण करीत आहेत.