पेन्शन अदालतच्या माध्यमातून मनपाच्या ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 08:43 PM2023-10-05T20:43:24+5:302023-10-05T20:54:06+5:30

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे पालकमंत्री लोढांनी केले जागीच निराकरण

350 retired employees of Municipal Corporation got justice through Pension Adalat | पेन्शन अदालतच्या माध्यमातून मनपाच्या ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

पेन्शन अदालतच्या माध्यमातून मनपाच्या ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

googlenewsNext

मुंबई, ५ ऑक्टोबर: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे महापालिकेच्या मुख्यालयात पहिल्यांदाच 'पेन्शन अदालत' चे आयोजन करण्यात आली होती.

या बैठकीद्वारे मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन संदर्भातील प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. या बैठकीसाठी. मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागातुन संबंधीत प्रशासकीय अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन ए ते टी विभातील प्रशासकीय अधिकारी, के.इ.एम, राजावाडी, लोकमान्य टिळक रुग्णालय सायन, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय येथील प्रशाकीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी व इतर संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन संदर्भातील प्रश्न आणि अडचणी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तात्काळ सोडवण्यात येतील.

आज ३५० पेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी समजून घेतल्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी जागीच चर्चा करून पेन्शन वितरण संदर्भातील प्रशासकीय अडचणींवर तात्काळ तोडगा काढला. सदर पेन्शन अदालतमध्ये आज १२९ लोकांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला तसेच २५० तक्रारी ऑनलाईन माध्यमातून प्राप्त झाल्या. आज उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी ५०% कर्मचाऱ्यांचे  पेन्शन ऑनलाईन माध्यमातून वितरित करण्यात आले. येत्या १५ दिवसात या सर्व लोकांना त्यांचे पेन्शन प्राप्त होईल याची व्यवस्था पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील अडचणी सोडवण्याचे आणि पुढील ३० ते ६० दिवसात सर्वांचे पेन्शन वितरित करावे असे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. 

प्रसंगी बोलतांना पालकमंत्री लोढा म्हणाले "महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पेन्शन साठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असे कष्टाने कमावलेले पेन्शन त्यांना सहज उपलब्ध होत नाही हे लक्षात घेऊन आम्ही पेन्शन अदालत सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मुंबईतील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रथम पेन्शन अदालत आज मुंबई महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली. या पेन्शन अदालत च्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील समस्या कोणताही वेळ न दवडता सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज कर्मचाऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यांच्या हक्काचे पेन्शन मिळाल्याने त्यांना झालेला आनंद बघून समाधान वाटले"

उपस्थितांनी आपल्या समस्या मांडण्याची संधी दिल्या बद्दल आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण केल्याबद्दल पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले. पेन्शन अदालत ६ ऑक्टोबर २०२३ रोजी देखील आयोजित करण्यात आली असून सकाळी १० वाजता या सभेची सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजता सभेची सांगता होईल.

Web Title: 350 retired employees of Municipal Corporation got justice through Pension Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.