३५०० विद्यार्थ्यांनी दिली अमेरिकी व्हिसासाठी मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:30 AM2023-06-08T10:30:43+5:302023-06-08T10:31:41+5:30
यंदा हे या मेळाव्याचे सातवे वर्ष होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वर्षाकाठी सातत्याने वाढ होताना दिसत असून, बुधवारी मुंबईसह देशातील प्रमुख शहरांत झालेल्या अमेरिकेच्या व्हिसा मुलाखतीसाठी ३५०० विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. देशपातळीवर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी यू. एस. मिशनतर्फे वार्षिक मेळावा घेतला जातो. यंदा हे या मेळाव्याचे सातवे वर्ष होते.
उपलब्ध माहितीनुसार, बुधवारी मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता येथे हा मेळावा पार पडला. सध्या अमेरिकेतील विविध विद्यापीठांत दोन लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने १ लाख २५ हजार भारतीय विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसा जारी केले होते. अमेरिकेने जारी केलेल्या विद्यार्थी व्हिसामध्ये प्रत्येक पाचवा व्हिसा हा भारतीय विद्यार्थ्याला मिळाला आहे. या वर्षीही विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी मुलाखती होणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे ॲम्बॅसडर एरिक गार्सेटी आणि कौन्सुल जनरल यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.