मुंबई- खड्डेचखड्डे चोहीकडे गेली पालिका कुणीकडे अशी काहींशी अवस्था झालेल्या मुंबई आणि पूर्व उपनगरांतील एक दोन नव्हे तर तब्बल 3, 510 खड्ड्यांचे रस्ते, मार्गासह सचित्र दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका प्रशासनाला घडविले आहे. गेल्या 17 दिवसांहून अधिक काळ गणेशोत्सव तोंडावर आल्याने मुंबई शहर आणि परिसरात खड्डे बुजवा यासाठी निवेदने, पाठपुरावा आंदोलन करूनही जराही कान हलवत नसलेल्या यंत्रणेला जागे करण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अॅड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनव आंदोलन छेडले. राष्ट्रवादीतर्फे मुंबई महापालिका प्रमुख अभियंते (रस्ते विभाग) राजन तळकर यांना आज घेराव घालून मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची फोटोसह भेट देण्यात आली.
मुंबई आणि पूर्व उपनगरातील अंधेरी, कांदिवली, साकीनाका आदी परिसरातील रस्त्यांवर एक दोन नव्हे तर तब्बल 3,510 खड्डे आहेत, असा दावा करताना सर्वाधिक खड्डे हे मुंबई उपनगरात आहेत, अशी माहिती अॅड.अमोल मातेले यांनी दिली. आम्ही आतापर्यंत अनेकदा मुंबई महापालिका प्रशासनाला खराब रस्ते दुरुस्त करा, या संदर्भात निवेदने दिली होती. परंतु, त्यानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने आम्ही येत्या काळात झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. चांगले रस्ते सर्वाधिक बजेट असलेली मुंबई महापालिका करदात्यांना देवू शकत नाही. ही करदात्या मुंबईकरांची उपेक्षा नव्हे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात रस्तेकामासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद असतानाही शहरातील सर्वच रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना तीन ते चार किमीचे अंतर पार करण्यासाठी तासन्तास रखडपट्टी सहन करावी लागत आहे. कंत्राटदार आणि पालिका अधिकार्यांच्या भेसळयुक्त युतीने मुंबईकरांना खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांतून दरवर्षी प्रवास करावा लागत आहे असा आरोप त्यांनी केला. आता ऐन गणेशोत्सवातही खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांतून मुंबईकरांना दिलासा न मिळाल्याने राष्ट्रवादीने येत्या काळात आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा अॅड.अमोल मातेले यांनी दिला.