लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना महासाथीचा विळखा सुटून आता दोन वर्षे झाली. कोरोनामुळे मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेनेही कात टाकली आहे. जागतिक पर्यटन क्षेत्रही त्यात मागे नाही. देशोदेशीचे पर्यटक आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी देऊ लागले आहेत. त्यातीलच एक म्हणजे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. गेल्या वर्षभरात ३५ हजार परदेशी पर्यटकांनी या वास्तूला भेट दिली आहे.
कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जहांगीर निकोलसन कला दालन, लहानग्यांसाठी विशेष संग्रहालय, विशेष प्रदर्शन कलादालन, कार्ल अँड मेहरबाई खंडालवाला कलादालन, भारतीय वस्त्रकला व पोशाख दालन, नैसर्गिक इतिहास दालन, चलन व अलंकार दालन, मुद्रण आणि चित्रकला दालन, मिनिएचर पेटिंग दालन, इंडियन मेटल अँड डेकोरेटीव्ह पेटिंग गॅलरी, हिमालयन दालन, कृष्णा आर्ट दालन, सर्क्युलर गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट, अजायबघर, इंडियन स्कल्पचर ही विविध दालने आहेत. याखेरीस, संग्रहालयात नियमितपणे उपक्रमांची रेलचेल असते त्या माध्यमातून कलात्मक अनुभव घेऊन पर्यटकांची भेट अधिक समृद्ध होते अशी माहिती संग्रहालयाचे प्रशासकीय विभागाचे सहायक संचालक अजय कोचले यांनी दिली आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात परदेशी आणि भारतीय पर्यटक मिळून १ लाख ४ हजार ९१ जणांनी संग्रहालयाला भेट दिली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४ लाख ९७ हजार ७५६ पर्यटकांनी भेट दिली, तर १ एप्रिल ते १९ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ३ लाख २५ हजार २५० पर्यटकांनी संग्रहालयाला भेट दिली आहे. मागील पाच वर्षांत आतापर्यंत २ लाख ६२ हजार बाल पर्यटकांनी संग्रहालयाला भेट दिली.
संशोधकांसाठी संधीची दारेछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ऐतिहासिक वा दुर्मीळ कला वस्तूंचा ठेवा पाहणे हीच केवळ पर्वणी नसून, नव्या पिढीतील अभ्यासक, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात. याबाबत वेळोवेळी संग्रहालयाच्या सोशल मीडिया व्यासपीठांवर माहिती देण्यात येते, तंत्रज्ञानाची कास धरत, पर्यावरणाचा समतोल साधून, जुने-प्राचीन वैभव जतन- संवर्धन करणे असे महत्त्वाचे कार्य संग्रहालयाकडून करण्यात येते.
कोरोनाच्या काळात पर्यटनावर निर्बंध आल्याने संग्रहालयाच्या पर्यटनावर परिणाम झाला होता. मात्र, आता त्यातून उभारी मिळून संग्रहालय प्रशासनाकडून पर्यटकांनी अधिकाधिक भेट द्यावी या अनुषंगाने उपक्रमांची आखणी होते आहे. तसेच, सातत्याने नवीन बदल स्वीकारत पर्यटकांना काहीतरी वेगळे देण्याचा संग्रहालय प्रशासनाचा कायमच प्रयत्न राहिला आहे.- अजय कोचले, सहायक संचालक, प्रशासकीय विभाग, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय