३५५ तालुक्यांत कुष्ठरोग शोध अभियान, आजपासून साडेआठ कोटी लोकांची तपासणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:27 AM2018-09-25T05:27:39+5:302018-09-25T05:27:55+5:30
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आजपासून ९ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांत व ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे.
मुंबई :राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आजपासून ९ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांत व ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. ७१ हजार २९७ शोधपथकांच्या साहाय्याने १४ दिवसांत सुमारे साडे आठ कोटी लोकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी दिली.
याबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, २०१७-१८मध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण दर दहा हजारी ०.८० पेक्षा जास्त असलेल्या २२ जिल्ह्यांत शोधमोहीम राबविण्यात आली. प्रत्येक गावातील स्थानिक ‘आशा’ कार्यकर्ती व एक पुरुष स्वयंसेवक यांचे पथक तयार करून ४ कोटी ५९ लाख २९ हजार ६६१ लोकांची प्रत्यक्ष तपासणी केली. त्यामध्ये १ लाख ६४ हजार ९६४ संशयित रुग्ण शोधण्यात आले व त्यांच्यावर बहुविध उपचार सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा प्रगती योजनेत समावेश केला आहे. त्या अनुषंगाने देशात विविध मोहिमा राबवून कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर बहुविध औषधोपचार करून त्यांना रोगमुक्त केले जात आहे.
गेल्या वर्षी ४ हजार १३४ रुग्ण
२०१६-१७मध्ये १६ जिल्ह्णांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. त्यात ४,१३४ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले व त्यांना बहुविध उपचार देऊन रोगमुक्त करण्यात आले. २०१५-१६मध्येही पाच जिल्ह्णांत शोधमोहीम राबवून १६६ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
अशी असणार शोधमोहीम
एकूण अपेक्षित लोकसंख्या - ८ कोटी ६२ लाख ६५ हजार ४३७
तालुक्यांची संख्या - ३५५
एकूण घरांची संख्या - १ कोटी ७२ लाख ५३ हजार ०८७
एकूण आवश्यक शोधपथक (टीम) संख्या - ७१ हजार २९७
सर्वेक्षण कालावधी - १४ दिवस ( २४ सप्टेंबर ते ०९ आॅक्टोबर २०१८)
शोधपथकात स्त्रियांची तपासणी करण्याकरिता एक ‘आशा’ कार्यकर्ती व पुरुषांची तपासणी करण्याकरिता एका स्वयंसेवकांचा समावेश असेल.
घरातील प्रत्येकांची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.
शोधण्यात आलेल्या प्रत्येक संशयिताची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून रोग निदान करण्यात येणार आहे.