२९७ नमुन्यांमध्ये ३५% डेल्टा व्हेरिअंट, ६२% डेल्टा डेरिव्हेटीव्ह अन् २% ओमायक्रॉन; पालिकेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 08:03 PM2021-12-15T20:03:32+5:302021-12-15T20:05:10+5:30

कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत ६ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष

357% delta variant, 62% delta derivative and 2% omicron in 297 samples; Municipal information | २९७ नमुन्यांमध्ये ३५% डेल्टा व्हेरिअंट, ६२% डेल्टा डेरिव्हेटीव्ह अन् २% ओमायक्रॉन; पालिकेची माहिती

२९७ नमुन्यांमध्ये ३५% डेल्टा व्हेरिअंट, ६२% डेल्टा डेरिव्हेटीव्ह अन् २% ओमायक्रॉन; पालिकेची माहिती

Next

मुंबई: कोविड - १९’ विषाणूच्या जनुकीय सुत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत सहाव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. यानुसार २९७ कोविड बाधित नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.

फेरीतील चाचण्यांचे वेगळेपण म्हणजे यावेळी प्रथमच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधील नमूने देखील या चाचण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. एकूण २९७ नमुन्यांपैकी ६२% अर्थात १८३ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकाराने; तर ३५% अर्थात १०५ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच २% म्हणजेच ७ नमुने हे ओमायक्रॉन या उप प्रकाराने व उर्वरित १% नमुने हे इतर उप प्रकारांनी बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, कोविड विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. नुकत्याच हाती आलेल्या ६ व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २९७ रुग्णांपैकी ३५% म्हणजेच १०३ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. या खालोखाल २७% म्हणजेच ८० रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील; तर २३% म्हणजेच ६८ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत.

याच निष्कर्षांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २९७ पैकी १९ रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तथापि, यापैकी कोणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही किंवा अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले नाही.   लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १९४ रुग्णांपैकी ३३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली, तर दुस-या एका रुग्णाला अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी ८४ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी २२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.

दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणूची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, २ किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे विनम्र आवाहन श्री. काकाणी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

पहिल्या फेरीतील चाचणी -

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्या टप्प्यातील (फर्स्ट बॅच) चाचण्यांचे निष्कर्ष ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या १८८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये अल्फा या उप प्रकारातील २, केपा या उप प्रकारातील २४ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.

दुस-या फेरीतील चाचणी - 

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये दुस-या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष सप्टेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या ३७६ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३०४ रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘नाईन्टीन-ए’ या उप प्रकारातील २, ‘द्वेन्टी-ए’ या उप प्रकारातील ४ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.

तिस-या फेरीतील चाचणी - 

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तिस-या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी १८५ रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील ११७ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.

चौथ्या फेरीतील चाचणी - 

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये चौथ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष नोव्हेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या २८१ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २१० रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील ७१ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.

पाचव्या फेरीतील चाचणी - 

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पाचव्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या २२१ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २४ रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील १९५, तर २ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.

Web Title: 357% delta variant, 62% delta derivative and 2% omicron in 297 samples; Municipal information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.