CoronaVirus News: ३६ टक्के नोकरदारांना मानसिक समस्यांचा विळखा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 02:08 AM2020-10-09T02:08:31+5:302020-10-09T06:54:53+5:30
जागतिक मानसिक आरोग्य दिन; कोरोनाचे असेही दुष्परिणाम
मुंबई : कोविडच्या परिस्थितीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, तर अनेकांना पगारकपातीलाही सामोरे जावे लागले. अशा स्थितीत आपले घर चालविण्यासाठी सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागतेय. या सर्व परिस्थितीमुळे ३६ टक्के नोकरदार मानसिक समस्यांच्या विळख्यात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिवाय, ५० टक्के सामान्य नोकरीतील अस्थिरतेमुळे चिंताग्रस्त असल्याचे दिसून आले आहे.
दिवसागणिक वाढणाऱ्या तणावाला सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आर्थिक गुंतवणूक आणि करिअरचा घसरता आलेख कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासाकरिता ३०, ४० आणि ५० वयोगटातील सामान्यांशी संवाद साधण्यात आला आहे. ज्या नोकरदारांचे उत्पन्न पाच लाखांहून कमी आहे, त्यांना सर्वाधिक मानसिक समस्या आहेत. या अहवालातील विशेष बाब म्हणजे, कोणत्याही व्यक्तीने मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेतलेले नाहीत वा आपल्याला भेडसावणाºया समस्यांविषयी समुपदेशकांशीही संवाद साधलेला नाही.
कोरोनामुळे नव्या स्वीकारलेल्या वर्क फ्रॉम होम जीवनशैलीतही ४४ टक्के नोकरदारांना सतत चिंता भेडसावत असते. तर २६ टक्के नोकरदार या पद्धतीला कंटाळले असल्याचे समोर आले आहे. याखेरीज ४८ टक्के नोकरदारांना असाइनमेंट, टार्गेट आणि टास्कमुळे सतत अस्थिरतेची भावना जाणवत आहे. दुसरीकडे कोविडमुळे बेरोजगार झालेल्यांमध्ये तणावाचे प्रमाण ६१ टक्के असून, क्रोधाचे परिणाम ४२ टक्के आहे.
मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या!
आपल्याकडे शारिरीक आजारांकरिता लाखोंनी पैसे खर्च करण्यात येतात, मात्र मानसिक आरोग्य स्वीकारलेही जात नाही. आता तरी ही परिस्थिती बदलायला हवी, सध्याचा काळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आपले वा आजूबाजूच्या व्यक्तींचे मानसिक स्थैर्य नीट नसेल तर वेळीच समुपदेशक वा मानसोपचारतज्ज्ञांना भेटून सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश शाह यांनी सांगितले.
तणावाची प्रमुख कारणे व त्याचे प्रमाण
३२% कौटुंबिक आरोग्य
१३% लहानग्यांचे शिक्षण
३२% कौटुंबिक आरोग्य
१७% नातेसंबंधांतील समस्या
२५% कुटुंबाचे मानसिक आरोग्य
१८% सामाजिक अंतर/ अलगीकरण
२२% कार्यालयीन प्रगती/अपरायझल