एएनसीची कारवाई : मध्य प्रदेशच्या दुकलीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतीच (एएनसी) १ कोटी १० लाख रुपयांच्या एमडीसह महिलेला अटक केली होती. त्या पाठोपाठ सोमवारी विलेपार्ले येथून ३६ किलो गांजा जप्त करण्यात आला.
एएनसीच्या वांद्रे पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांना विलेपार्ले परिसरात दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ३६ किलो गांजा जप्त करण्यात आला. शफीउर अहमद मोहिद्दीन रेहमान (५१) आणि सबुर अहमद मोहिद्दीन खान (५१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक आयुक्त राजेंद्र चिखले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
* दाम्पत्य घरातूनच करत होते ड्रग्ज विक्री
यापूर्वी घरातून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सनम सय्यद या महिलेला पथकाने शुक्रवारी अटक केली. या कारवाईदरम्यान एमडी या अत्यंत घातक अमली पदार्थाचा १ कोटी १० रुपयांचा साठा आणि आठ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. सनमचा पती तारिक सय्यद हा ड्रग्जचा मोठा वितरक आहे, तर सनम किरकोळ स्वरूपात विक्री करणाऱ्यांना एमडी उपलब्ध करून देत असे. सध्या तिच्या पतीचा शोध सुरू आहे.
............................