मुंबई : सध्या वीजबिल वसुलीची मोहीम महावितरणने राबविली असून, तात्पुरता व कायमस्वरूपी खंडित केलेली वीज जोडणीची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान, अशाच एका प्रकरणामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २ लाख ६६ हजार ७३२ युनिटची ३६ लाख ४ हजार २२० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.
पन्नालाल उपविभागातील अधिकारी व कर्मचारी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित कलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यासाठी गेले होते. ८ लाख ९५ हजार ३२० रुपये थकबाकी असलेले कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक मेसर्स मुमताज एन्टरप्रायझेस यांच्या तपासणीसाठी गेले असता, निदर्शनास आले की गाळ्याचे शटर बाहेरून बंद असूनसुद्धा गाळ्यामध्ये यंत्र सुरू असल्याचा आवाज येत होता. दरम्यान, तपासणी केली असता ग्राहक मेसर्स एम. पी. एन्टरप्रायझेसच्या गाळ्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलला टी-जॉइंट करून मीटर बायपास करण्यात आले असल्याचे आढळून आले. ज्यामुळे होणारा वीज वापर विद्युत मीटरवर नोंद केला जात नाही. सदर गाळ्यामधून केबल विस्तार करून नजीकच्या विद्युत पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाला देण्यात आला होता. हा प्रकार वीजचोरीत येत असल्याने मेसर्स एम. पी. एन्टरप्रायझेस यांच्यावर कारवाई करण्यात आली. वीजबिलाची आकारणी केली असता, त्या अंतर्गत एकूण २ लाख ६६ हजार ७३२ युनिटची वीजचोरी झाल्याचे आढळून आले आहे. ज्याची रक्कम ३६ लाख ४ हजार २२० आहे.
मेसर्स एम. पी. एन्टरप्रायझेस यांना वीज बिल २७ ऑगस्ट रोजी देण्यात आले. ग्राहकाने वीज बिल विहित कालावधीत भरले नाही. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी भांडुप पोलीस ठाणे येथे मेसर्स एम. पी. एन्टरप्रायझेसचे ब्रिजेश प्रेमनाथ उपाध्याय, अखिलेश प्रेमनाथ उपाध्याय व विवेक उपाध्याय यांच्यावर वीजचोरी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई भांडूप विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नालाल उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनोद देशमुख, सहाय्यक अभियंता श्रुतिका वेर्णेकर यांच्याद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.