३६ नवीन पादचारी पूल बांधणार
By Admin | Published: October 7, 2016 05:33 AM2016-10-07T05:33:27+5:302016-10-07T05:33:27+5:30
रूळ ओलांडताना प्रवाशांना किंवा स्थानिकांना अपघातांना तोंड द्यावे लागते. होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर १00 कोटी रुपये खर्चून तब्बल ३६ पादचारी पूल दोन वर्षांत बांधले जाणार आहेत.
मुंबई : रूळ ओलांडताना प्रवाशांना किंवा स्थानिकांना अपघातांना तोंड द्यावे लागते. होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर १00 कोटी रुपये खर्चून तब्बल ३६ पादचारी पूल दोन वर्षांत बांधले जाणार आहेत. यामध्ये सध्या असलेले आठ पादचारी पूल पाडून ते नव्याने बांधले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
रेल्वे अपघातात वर्षाला तीन ते चार हजार जणांचे मृत्यू होतानाच यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना होत असल्याचेही निदर्शनास आले. याचे सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी पादचारी पुलांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी एमआरव्हीसी तसेच स्थानिक पालिकांच्या साहाय्याने मध्य रेल्वेने पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. असे ३६ पूल उभारण्यात येणार असून यातील १७ पूल हे मध्य रेल्वेकडून, १0 पूल एमआरव्हीसी आणि ९ पूल हे विविध पालिकांकडून उभारले जातील. प्रत्येक पूल उभारण्यासाठी साधारण अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
एमआरव्हीसीतर्फे बांधले जाणारे पूल
दादर, कुर्ला (सीएसटी दिशेने), कुर्ला (कल्याणच्या दिशेने), ठाणे, ठाकुर्ली, कल्याण, दिवा (मुंबईकडे), वडाळा रोड, चेंबूर (मुंबईकडे), मानखुर्द.
मुंबई पालिकेकडून उभारण्यात येणारे
करी रोड, गोवंडी-मानखुर्द दरम्यान (दोन पूल), मानखुर्द-वाशी दरम्यान, शीव-कुर्ला दरम्यान, कुर्ला.
नवी मुंबई पालिकेद्वारे उभारण्यात येणारे
सानपाडा व तुर्भे
ठाणे पालिकेकडून बांधला जाणारा पूल
कळवा
मध्य रेल्वेतर्फे बांधण्यात येणारे नवे पूल
नाहूर, ठाणे, वांगणी, करी रोड, दादर, शीव (दोन पूल), परळ, मशीद.
भांडुप (कल्याणच्या दिशेने), शिवडी (सीएसटी दिशेने), मुंब्रा (सीएसटी दिशेने), दिवा (मुंबईच्या दिशेकडील), आसनगाव (सध्याचा पूल), नेरळ (सध्याचा पूल), माटुंगा (सीएसटी दिशेने), शीव.
प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले पूल
कांजूरमार्ग, रे रोड, किंग्ज सर्कल, चेंबूर, चेंबूर-गोवंडी दरम्यान, विद्याविहार आणि कसाईवाडा (कुर्ला), मुंब्रा, विठ्ठलवाडी, शहाड, कर्जत.