नालासोपारा स्फोटक प्रकरण: पाप नको म्हणून श्रावणानंतर 'ते' करणार होते ३६ जणांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 12:02 AM2018-09-15T00:02:07+5:302018-09-15T06:13:04+5:30
नालासोपारा प्रकरणातील आरोपींचा खुलासा
- बापू सोळुंके
औरंगाबाद : मुंबईतील नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एटीएसने सुरू केलेल्या अटक सत्रातील आरोपींचा श्रावणानंतर हिटलिस्टवरील तब्बल ३६ लोकांना उडविण्याचा कट होता, अशी खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. पवित्र श्रावण महिन्यात पाप नको म्हणून या हत्या पुढे ढकलल्या होत्या, असा खुलासा आरोपींनीच केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नालासोपारा येथून स्फोटकांचा साठा हस्तगत केल्यापासून दहशतवादविरोधी पथकाने आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून नऊ जणांना एटीएसने अटक केली. हे सर्व जण कट्टर हिंदुत्ववादी विचाराने भारावलेले आहेत. त्यांच्यामध्ये सचिन अंदुरे (रा.कुंवारफल्ली, औरंगाबाद) आणि शरद कळसकर(रा. केसापुरी, ता. औरंगाबाद), जालना येथील माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर, जळगाव येथील वासुदेव सूर्यवंशी, विजय लोधी आणि अन्य संशयितांचा समावेश आहे.
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंदुरे आणि कळसकर यांनी पाच वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या केली होती. त्यांच्याप्रमाणेच देशभरातील ३६ जणांना उडविण्याचा कट त्यांनी रचला होता. या लोकांच्या नावांची यादीच एटीएसच्या हाती लागली. या हत्या करण्यासाठी देशभरातील कट्टर हिंदुत्ववादी तरुणांची मोट बांधण्यात आली होती. या तरुणांना स्फोटके हाताळणे आणि पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटनेप्रमाणे काम : या हत्या करण्यासाठी तयार झालेले आणि त्यांना त्यासाठी तयार करणारे, तसेच त्यांना शस्त्र आणि पैसा पुरविणारे हे परस्परांना खऱ्या नावाने ओळखत नाहीत. एखाद्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटनेप्रमाणे या लोकांचे काम चालते. त्यांच्यात मोबाईल अथवा फोनवरून संभाषणही होत नसे. यामुळे या लोकांना पकडणे तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.
आर्थिक देवाणघेवाण नाही : या हत्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तरुणांसोबत कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण केली जात नाही. केवळ त्यांचे ब्रेन वॉश करून हिंदू धर्माला विरोध करणाºयांना संपविण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले जात होते, असेही तपासातून स्पष्ट झाले आहे.