यशवंत जाधव आणि निकटवर्तीयांनी २ वर्षांत खरेदी केल्या ३६ मालमत्ता; चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:41 AM2022-03-21T05:41:02+5:302022-03-21T05:42:39+5:30
कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फाइलदेखील सापडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, त्यांचे निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. यातच, जाधव व त्यांच्या निकटवर्तीयांनी गेल्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे.
प्राप्तिकर विभागाने गेल्या महिन्यात जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय बिमल अगरवाल तसेच ५ सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली. शोध मोहिमेदरम्यान, महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. हे जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि त्या व्यक्तीमध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. सुमारे १३० कोटींपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. त्यात त्यांच्या किंवा त्यांच्या सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत या मालमत्ता घेतल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात खरेदी केलेल्या २७ मालमत्तांचा समावेश आहे.
कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फाईलदेखील सापडल्या आहेत. मात्र, त्याच्या नोंद खात्याच्या नियमित पुस्तकांत नसल्याचेही प्राप्तिकर विभागाने नमूद केले.
२०० कोटी रुपयांचे उत्पन्न दडवले
काही व्यवहारांमध्ये असेही आढळून आले की, या कंपन्यांकडून रोख रक्कम काढण्यात आली, आणि त्याचा वापर कंत्राटे देण्याबरोबर मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी पैसे देण्यासाठी केला गेल्याचेही समोर आल्याचे प्राप्तिकर विभागाने समोर स्पष्ट केले. या गैरव्यवहारांद्वारे कंत्राटदारांनी २०० कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचे प्राथमिक तपासात आढळले होते. याबाबत प्राप्तिकर विभाग तपास करत आहे.