देशभरात पश्चिम रेल्वेच्या मालगाड्यांच्या ३६ फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 04:50 PM2020-04-13T16:50:26+5:302020-04-13T16:51:13+5:30
जीवनावश्यक वस्तूची वाहतूक
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मालगाड्याद्वारे केला जात आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने ३६ फेऱ्या चालविल्या आहेत. या फेऱ्यामधून एकूण १ हजार २०७ माल डब्यांची वाहतूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने २४ मार्चपासून एक्सप्रेस, उपनगरीय लोकल बंद केल्या आहेत. या काळात फक्त २४ तास मालगाडीची वाहतूक सेवा सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून मालगाडीद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. मुंबई विभागातून मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस येथून मालगाड्यांची वाहतूक सुरु आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी रेल्वे मंडळाने भारतीय रेल्वे सेवा बंद केली. त्याचपाठोपाठ 22 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली आहे. त्यानंतर 24 मार्चला मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमाने रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात लहान पार्सल आकारातील वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद पडू नये, यासाठी पश्चिम रेल्वेनी पार्सल वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबईसह इतर विभागातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सेवा सुरु आहे. २२ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वे प्रशासनाने देशभरात १ हजार २०७ माल डब्यांची वाहतूक केली आहे. यामध्ये २.५९ मिलियन टन जीवनावश्यक वस्तू होत्या. यासह दूध, दूध पावडर नेण्यासाठी विशेष सुविधा केली होती. लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वे द्वारे १२ विशेष मालगाड्यांचे वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकातून ५६ फेऱ्या मालवाहतुकीच्या होणार आहेत. १२ एप्रिल रोजी पाच विशेष मालगाड्या चालविण्यात आल्या. यामध्ये दादर ते भुज, मुंबई सेंट्रल ते फिरोजपूर, ओखा ते वांद्रे टर्मिनस तर, उर्वरित दोन फेऱ्या गुजरात मधून होणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.