मुंबई विभागातील ३६ % आरटीई प्रवेश निश्चित, ३१ ऑगस्टनंतर वेटिंग लिस्टला प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:19 AM2020-08-22T02:19:01+5:302020-08-22T02:19:07+5:30
पालकांना प्रवेशासाठी मुभा जाणार दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई : राज्य सरकारकडून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश सुरू झाले असून, पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत शाळांमध्ये प्रवेश निश्चिती करायची आहे; अन्यथा त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी मुभा जाणार दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई विभागातून आतापर्यंत केवळ ३६.५८ % प्रवेश निश्चित झाले आहेत. ४३.३८ % विद्यार्थ्यांचे अद्याप तात्पुरते प्रवेश करण्यात आले आहेत. ३१ आॅगस्टनंतरच्या यादीत वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने पालक-विद्यार्थ्यांनी ३१ आॅगस्टपूर्वी प्रवेश निश्चिती करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
मुंबई विभागात आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ५,३७१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यातील ४,०५३ विद्यार्थी पालिका विभागातील तर १,३१८ विद्यार्थी मुंबई उपसंचालक विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांतील आहेत. आतापर्यंत ४ हजार ७०९ विद्यार्थ्यांना शाळांनी पालकांना प्रवेश निश्चितीसाठी तारखा दिल्या आहेत तर ६६२ शाळांनी अद्याप पालकांना प्रवेशासाठी तारखा दिल्या नाहीत. २,३३० विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांनी केवळ तात्पुरते प्रवेश घेऊन ठेवले आहेत. मात्र अद्याप त्यांनी प्रवेशाची निश्चिती केली नाही. त्यामुळे फक्त १,९६५ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती होऊ शकली आहे. शाळांनी या पालकांना संपर्क करून , आवश्यक बाबी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती करून घ्यावी जेणेकरून विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाहीत अशा सूचना शिक्षण संचालनालयाकडून दिल्या आहेत.
शाळांना पालकांना शाळेत येऊन प्रवेश निश्चितीसाठी तारीख देण्याच्या सूचना शिक्षण विभागामार्फत करण्यात आल्या आहेत. यादरम्यान पालकांना बोलावलेल्या तारखेला शाळेत जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा स्तरावरच प्रवेशनिश्चिती करायची आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी पालकांनी गर्दी करू नये. ई मेल, दूरध्वनीद्वारे संपर्क करून प्रवेश करून घ्यावेत, असे संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे. मात्र मुंबई विभागात अद्याप काही प्रमाणात लॉकडाऊन कायम असल्याने अनेक पालकांनी शाळांना संपर्कच केला नसल्याने प्रवेश रेंगाळले असल्याचे समोर येत आहे.