एका प्रवाशासाठी ३६० सीटर विमानाचे उड्डाण, मुंबई ते दुबई प्रवास; १८ हजार रुपयांत अनोख्या सफरीचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:42 AM2021-05-27T06:42:45+5:302021-05-27T06:43:07+5:30
Airplane News: सीट फुल झाल्याशिवाय आपल्याकडे वडापही मार्गस्थ होत नाही. पण ३६० सीटर विमान केवळ एका प्रवाशाला घेऊन मुंबईहून दुबईला रवाना झाले. या अनोख्या प्रवासाचा ज्यांना आनंद मिळाला त्या प्रवाशाचे नाव आहे भावेश झवेरी.
मुंबई : सीट फुल झाल्याशिवाय आपल्याकडे वडापही मार्गस्थ होत नाही. पण ३६० सीटर विमान केवळ एका प्रवाशाला घेऊन मुंबईहून दुबईला रवाना झाले. या अनोख्या प्रवासाचा ज्यांना आनंद मिळाला, त्या प्रवाशाचे नाव आहे भावेश झवेरी. त्यांनी या प्रवासासाठी केवळ १८ हजार रुपये मोजले आहेत.
संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) भारतीय प्रवाशांवरील बंदी १४ जूनपर्यंत वाढविली आहे. यूएईचे नागरिक, गोल्डन व्हिसाधारक व शासकीय मोहिमेवर असलेल्यांनाच यातून सूट आहे. त्यामुळे दुबई वा संयुक्त अरब अमिरातीत जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
तुम्ही एकमेव प्रवासी या विमानातून प्रवास करणार आहात, असे कर्मचाऱ्यांनी सांगताच भावेश यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी या प्रवासाचे चित्रीकरण केले. विमान कर्मचाऱ्यांनीही भावेश यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. वैमानिक त्यांना भेटण्यासाठी प्रवेशद्वारावर आला. केबिन क्रूकडून सर्व सूचना भावेश झवेरी यांच्या नावाने देण्यात आल्या. मिस्टर झवेरी सीटबेल्ट बांधा, आता आपण लँडिंगसाठी तयार आहोत वगैरे वगैरे. अशा अनोखी हवाई सफरीचा आनंद घेणारी मी पहिलीच व्यक्ती असेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दुबईत पोहोचल्यावर व्यक्त केली.
गोल्डन व्हिसाधारक प्रवासी
केवळ एका प्रवाशाने बुकिंग केल्याने कंपनीही चिंतेत होती. शेवटच्या तासापर्यंत आणखी बुकिंग न मिळाल्याने झवेरी या गोल्डन व्हिसाधारक प्रवाशाला घेऊन विमान मार्गस्थ करावे लागले. असे असले तरी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवेत कोणतीही कसूर सोडली नाही.
आठ लाखांचे इंधन खर्च
बोइंग ७७७ (डबल इंजिन विमान) हे जगातील सर्वात मोठे विमान म्हणून ओळखले जाते.
मुंबई-दुबई अंतर ते अडीच तासांत कापते. त्यासाठी १७ टन इंधन लागते. त्याचे बाजारमूल्य आठ लाखांच्या घरात आहे.
एकीकडे कोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्र सर्वाधिक तोट्यात असताना एका प्रवाशासाठी इतका खर्च विमान कंपनीला परवडला कसा, हा सवाल उपस्थित होत आहे.