मेट्रो ३ च्या भुयारीकरणाचा ३६ वा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:06 AM2021-02-13T04:06:42+5:302021-02-13T04:06:42+5:30
पॅकेज ६ चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे शुक्रवारी सहार ...
पॅकेज ६ चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे शुक्रवारी सहार रोड ते राष्ट्रीय विमानतळ स्थानक हा १.५ किलोमीटर लांबीचा ३६ वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. तापी-१ आणि तापी-२ या दोन टनेल बोअरिंग मशीन्सच्या मदतीने पॅकेज ६ने एकूण ४.४ कि.मी.चे भुयारीकरण पूर्ण केले; तर दुसरीकडे मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५०.३ कि.मी. म्हणजे ९३ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सांगितले की, या पॅकेजमधील दोन स्थानके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलवर आहेत. या दोन्ही स्थानकांना एअरपोर्ट टर्मिनलशी जोडले जाईल. त्यामुळे विमानतळापर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे; तर संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले की, हार्ड रॉक तंत्रज्ञानाने सुसज्ज टेराटॅकनिर्मित टीबीएम तापी - १ आणि २ द्वारे १५ महिन्यांत भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राष्ट्रीय विमानतळ स्थानकाचे जवळपास ७६.४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
* या मेट्राे स्थानकांचा समावेश
पॅकेज-६ अंतर्गत राष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सहार रोड मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
या पॅकेजमध्ये ४ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सहार रोड (अपलाईन - ६८७ मीटर आणि डाउनलाईन - ६९२ मीटर)
सहार रोड ते राष्ट्रीय विमानतळ (अपलाईन - १५१५ मीटर आणि डाउनलाईन - १५१२ मीटर)
-------------------