पालिकेच्या ३७ शाळांना टेकूचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:36 AM2019-08-31T00:36:55+5:302019-08-31T00:37:02+5:30
विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : पायाभूत सुविधा विभागाकडे पुरेशी माहितीच उपलब्ध नाही
मुंबई : विद्यार्थी शाळेत जाताना त्याची सुरक्षितता ही पालकांसाठी सगळ्यात महत्त्वाची असते. मात्र जर शाळेची इमारतच टेकूवर उभी असेल, तर पालक आपल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेत का पाठवतील, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या ४१७ शाळा इमारती आहेत. यापैकी काही इमारतींमध्ये पायाभूत सुविधा विभाग (एसआयसी) कडून पुनर्बांधणी, तसेच इतर दुरुस्ती कामे सुरू आहेत. या शाळांव्यतिरिक्त ३७ शाळा इमारतींना टेकू लावल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र सद्य:स्थितीत अनेक पालिका शाळांची दुरुस्ती, नवीन इमारती बांधण्याचे काम यामुळे अनेक विद्यार्थी इतर शाळांत प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम पालिका शाळांतील विद्यार्थी संख्येवर निश्चितच होत आहे.
या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या ३० आॅगस्ट २०१९ रोजी झालेल्या बैठकीत शिक्षण समिती सदस्य म्हणून साईनाथ दुर्गे यांनी पालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाच्या अनागोंदी कारभारासंदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. पालिकेच्या अखत्यारीतील किती शाळा इमारतींना टेकू लावण्यात आलेले आहेत,
किती शाळा इमारतींना धोकादायक म्हणून घोषित केले आहे व या कारणाने किती शाळा स्थलांतरित केल्या आहेत, याची विचारणा त्यांनी समितीमध्ये या विभागाकडे केली असता त्यांच्याकडे यासंबंधी माहिती नसल्याचे समोर आले. हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि सुरक्षिततेशी खेळ असून यावर त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला असल्याची माहिती दिली.
रेन वॉटर हार्वेस्टिंग बंद
सोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून पुनर्बांधणी केलेल्या तसेच प्रमुख दुरुस्ती केलेल्या शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी प्रत्येक शाळेमागे २ ते ३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही अनेक शाळांमध्ये हे प्रकल्प कार्यान्वित नाहीत. अशा महत्त्वाच्या प्रकल्पाची दुरवस्था होणे, ही अतिशय दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण विभागाकडून शाळा पायाभूत सुविधा विभागासाठी २०१.७३ कोटी रुपयांची वार्षिक तरतूद करण्यात आलेली आहे. सदर विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा संपूर्ण अहवाल बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीला सादर करावा, अशी माझी मागणी मी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली आहे.
- साईनाथ दुर्गे, शिक्षण समिती सदस्य, शिवसेना