Join us

‘समृद्धी’ लगतच्या जागेतून ३७ मे.वॉट सौरऊर्जा मिळणार; १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 10:44 AM

समृद्धी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेतून अक्षय ऊर्जा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समृद्धी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेतून अक्षय ऊर्जा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. समृद्धी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेतून ३७ मेगावॅट विजेची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने एमएसआरडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांत समृद्धी महामार्गालगत ही सौरऊर्जा निर्मिती केली जाणार असून, त्यासाठी १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

एमएसआरडीसीची राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर भागातील कार्यालये, टोलनाके यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज लागते. तसेच समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसारख्या रस्त्यांवरही जागोजागी विजेचे दिवे उभारावे लागतात. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोगद्यांमध्येही वायुविजन यंत्रणा आणि दिव्यांसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. 

कंत्राटदाराची ३० वर्षांसाठी नियुक्ती

अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण इंटरचेंज येथील १६ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.  इगतपुरीजवळ ४५ एकर जागेवर १४ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्याचबरोबर टोलनाके, पेट्रोल पंप, महामार्गालगतच्या सुविधा आणि एमएसआरडीसीच्या कार्यालयांजवळील जागेतून ७ मेगावॅट सौर विजेचे उत्पादन घेण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. दरम्यान, कंत्राटदाराची ३० वर्षांच्या कालावधीसाठी एमएसआरडीसीकडून नियुक्ती केली जाणार आहे.

 

टॅग्स :समृद्धी महामार्ग