मुंबई : भारतातील सर्वांत महागड्या घर खरेदीची मुंबईत नोंद झाली आहे. गर्भनिरोधक उत्पादक कंपनी ‘फॅमी केअर’चे संस्थापक तथा प्रसिद्ध उद्योगपती जे. पी. तपारिया यांच्या परिवाराने दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात ३६९ कोटी रुपयांना एक लक्झरी ट्रिप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे.
वाळकेश्वर रोडवरील ‘लोढा मलबार’ टॉवरमधील तीन मजले मिळून ही मालमत्ता आहे. या इमारतीचे अजून बांधकामच सुरू आहे. या इमारतीच्या एका बाजूला राज्यपालांचे निवासस्थान, तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आणि हँगिंग गार्डन आहे. एकूण मूल्य तसेच प्रतिचौरस फुटाच्या हिशेबाने ही भारतातील सर्वाधिक महागडी मालमत्ता ठरली आहे.
माजी अटर्नी जनरल राेहतगींच्या पत्नींनी खरेदी केला १६० काेटींचा बंगला
भारताचे माजी अटर्नी जनरल मुकुल राेहतगी यांच्या पत्नी वसुधा राेहतगी यांनीही दिल्लीतील उच्चभ्रू वसाहतीत १६० काेटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. हा बंगला २ हजार १०० वर्ग यार्ड एवढ्या विस्तीर्ण जागेत बांधण्यात आला आहे. २३ फेब्रुवारी राेजी बंगल्याच्या खरेदीची नाेंदणी करण्यात आली असून, त्यासाठी ६.४ काेटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
१.३६ लाख प्रतिचौरस फूट दर
- १.०८ एकरांवर उभारण्यात येत आहे सुपर-लक्झरी निवासी टॉवर.
- जून २०२६ मध्ये बांधकाम पूर्ण होणार आहे.
- १९.०७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क तपारिया परिवाराने भरले आहे.
- १५ दिवसांपूर्वी बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी लक्झरी पेंटहाउस २५२.५० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.