मुंबई : कोविडच्या संसर्गानंतर सुरुवातीला अवयवदानाच्या मोहिमेला खीळ बसली होती. अवयवदान प्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका असल्याने ही प्रक्रिया दुसऱ्या लाटेदरम्यान धीम्या गतीने सुरु झाली. त्यामुळे शहर उपनगरात सुमारे ३ हजार ७०० व्यक्ती अवयवदानाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मुंबई जिल्हे विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीने दिली आहे.मागील वर्षात अवयवदानाचा टक्का ३० वर येऊन ठेपला, अवयवदानात ६९ टक्क्यांनी घट झाली. कारण त्या काळात रुग्णालयातील मनुष्यबळ आणि अतिदक्षता विभागांसह अन्य विभाग कोविडच्या सेवेत होते. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १८ अवयवदान झाले आहेत. मुंबईत मागील पाच वर्षांत २२५ कॅडेव्हर डोनेशन झाले आहेत. अनेक रुग्णांना नातेवाईकांनी मूत्रपिंड दिल्यामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. तथापि ‘कॅडेव्हर डोनेशन’ म्हणजे ब्रेन डेड झालेल्या रुग्णांकडून होणाऱ्या अवयवदानाबाबत गेल्या दोन दशकात फारशी प्रगती झालेली नाही.याविषयी, मुंबई जिल्हे विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश माथूर यांनी सांगितले, कोविड संसर्गादरम्यान प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अजून एकही बाधित झाल्याचे उदाहरण नाही, त्यामुळे आता शहर उपनगरातील रुग्णालयांनी पुन्हा अवयवदानाची प्रक्रिया कोरोनाविषयक नियम पाळून सुरु करायला हवी. शिवाय, याकरिता खासगी रुग्णालयांनीही पुढाकार घेतला पाहिजे. शहर उपनगरातील रुग्णालयांनी पुन्हा अवयवदानाची प्रक्रिया कोरोनाविषयक नियम पाळून सुरु करायला हवी. याकरिता खासगी रुग्णालयांनीही पुढाकार घेतला पाहिजे. शासन तसेच खासगी रुग्णालयांकडून अवयवदान चळवळ (कॅडेव्हर) रुजण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्यामुळे अवयवदानात फारशी वाढ होऊ शकलेली नाही.
मुंबईत ३ हजार ७०० व्यक्ती अवयवदानाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 9:57 AM