Join us  

गरज सरो, वैद्य मरो म्हणत ३७ हजार नर्सेस कौन्सिलने ठरविल्या बोगस?; चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 7:01 AM

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होणार

मुंबई : राज्यात कोरोनाने कहर केला तेव्हा नर्सेसची प्रचंड गरज निर्माण झाली. नर्सिंगचा अभ्यासक्रम पास झालेल्यांना ऑनलाईन गुणपत्रिकेच्या आधारावर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने ऑनलाईन नोंदणी करून घेतल्याने तब्बल ३७ हजार नव्याने पास झालेल्या नर्सेस मिळू शकल्या. लोक घरातून बाहेर पडायला घाबरत असताना या नर्सेस कामावर आल्या. मात्र आता गरज सरो, वैद्य मरो या न्यायाने त्या सगळ्या नर्सेसची नोंदणी बोगस झाल्याचा ठपका नर्सेस कौन्सिलच्या अध्यक्षांनी रजिस्ट्रारवर ठेवला. त्यामुळे या प्रकाराने हतबल झालेल्या रजिस्ट्रारनी वैतागून थेट राजीनामाच दिला. आता या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. नर्सिंगचा अधिकृत अभ्यासक्रम पास झालेल्या नर्सेसची कौन्सिलमार्फत नोंदणी करून घेते. या नोंदणीशिवाय रुग्णालयात काम करता येत नाही. कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याकरिता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची कौन्सिल कार्यालयात तपासणी करून नोंदणी केली जाते. कोरोना काळात विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन गुणपत्रिका उपलब्ध असल्याने छापील मार्कशीट मिळत नव्हत्या.

मार्कशीट देणाऱ्या महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ यांनीही नोव्हेंबर २०२१ मध्ये या संस्थेनेही गुणपत्रिकाची छपाई झाली नसल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी, अशा आशयाचे पत्र कौन्सिलच्या रजिस्ट्रार यांना दिले होते. त्या काळात कौन्सिलवर निवडून आलेल्या सदस्यांची समिती नव्हती. शासनाने प्रशासक नेमले होते.

ऑगस्ट २०२२ मध्ये  निवडून आलेल्या सदस्यांमार्फत कौन्सिलवर रामलिंगम माळी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यांना २०१४-१५ या काळातील दोन विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी प्रमाण पत्र आढळून आली. त्यानंतर त्यांनी आणखी या प्रकरणाची चौकशी केली असता ३७ हजार विद्यार्थ्यांना बोगस पद्धतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिल्याचे निदर्शनास आल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे संबंधित रजिस्ट्रार रेचेल जॉर्ज यांच्यावर विविध विषयांचा ठपका ठेऊन २१ सप्टेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याचे उत्तर त्यांनी १२ ऑक्टोबरला दिले आणि सोबत राजीनामाही दिला.

कोरोना काळात परिचारिकांची मोठया प्रमाणात गरज असल्याने ऑनलाईन गुणपत्रिकेच्या आधावर नोंदणी करून घेतली गेली. ज्या विद्यार्थ्यांची बोगस प्रमाण पत्रे मिळाली ती २०१४-१५ या वर्षातील आहेत. त्यावेळी आपण या पदावर नव्हतो. दोन विद्यार्थ्यांचा बोगस प्रमाणपत्रावरून सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी बोगस ठरविणे चूक आहे.  मी आणीबाणीच्या परिस्थितीत सामाजिक हीत लक्षात घेऊन नोंदणी करून दिली. यामध्ये माझी काय चूक हे मला कळत नाही. सर्व आरोपांचे उत्तर मी कौन्सिलला दिले आहे. अनेकवेळा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने मी राजीनामा दिला आहे. याप्रकरणी शासनाने आणि पोलीस विभागाने चौकशी करावी. जो दोषी असेल त्याला शिक्षा द्यावी.   - रेचल जॉर्ज, राजीनामा दिलेल्या रजिस्ट्रार

टॅग्स :वैद्यकीय