मुंबई : महापालिका क्षेत्रात विविध ३८ व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोग्य खात्याद्वारे संबंधित परवानग्या देण्यात येतात. या परवानग्यांसाठीच्या अटी व शर्ती तसेच ना-हरकत प्रमाणपत्रांची संख्या ७२ वरून ५१ करण्यात आली आहे. ३८ पैकी कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी यापूर्वी महापालिकेच्या इमारत व कारखाने खात्याचे आणि अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र आरोग्य खात्याकडे सादर करावे लागत होते. मात्र ही अट आता सुधारण्यात आली आहे. त्यानुसार केवळ अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आता आवश्यक असेल.नवीन उपाहारगृह, लॉजिंग हाऊस, परमीट रूम, बीयर बार, मिठाईचे दुकान, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, शीतपेय विक्रीची दुकाने, पिठाची गिरणी, फ्रूट ज्यूस सेंटर, फळ व खाद्यपदार्थांसाठीची शीतगृहे, लॉन्ड्री शॉप, दुधाचे दुकान, हेअर सलून, औषधांची दुकाने, पानाची गादी, बेकरी शॉप, घोड्यांचे तबेले, उसाच्या रसाची दुकाने, पापड निर्मिती, सोडावॉटर निर्मिती, चहापेय विक्री दुकान, खाद्यतेल निर्मिती उद्योग यासारखे व्यवसाय महापालिका क्षेत्रात सुरू करायचे झाल्यास याबाबत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे परवानगी दिली जाते. ३८ व्यवसायांच्या परवानगी प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात संबंधित व्यवसाय सुरू करणे आता तुलनेने अधिक सुलभ होणार आहे. या विनागरजेच्या परवानग्यांना कात्री लावण्यास आयुक्त अजय मेहता यांनी मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)परवानेपत्रेही तीन पातळ्यांवरसंबंधित परवानेपत्र देण्याची प्रक्रिया यापूर्वी पाच पातळ्यांवर होत होती. ज्यामध्ये विभाग कार्यालय ते कार्यकारी आरोग्य अधिकारी अशा सर्व स्तरांवर संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्याची कार्यवाही होत होती. मात्र आता सुधारित पद्धतीनुसार ही प्रक्रिया तीन पातळ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. ज्यामध्ये सर्व प्रक्रिया प्रामुख्याने महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या (वॉर्ड आॅफिस) स्तरावरच पूर्ण होणार आहेत.
३८ व्यवसायांसाठी आता केवळ ५१ परवानग्या
By admin | Published: February 27, 2016 3:14 AM