Join us  

३८ दुचाकींसह २ कार खाक

By admin | Published: March 22, 2016 3:48 AM

करीरोड येथील विघ्नहर्ता सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या वाहनांना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या जळीतकांडात तब्बल ३८ दुचाकी आणि २ कार जळून खाक झाल्या आहेत

मुंबई : करीरोड येथील विघ्नहर्ता सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या वाहनांना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या जळीतकांडात तब्बल ३८ दुचाकी आणि २ कार जळून खाक झाल्या आहेत, तर अनेक वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.करी रोड येथील महादेव पालव मागावरील विघ्नहर्ता या सोसायटीमध्ये ५४० कुटुंबे राहतात. या सोसायटीच्या परिसरात सुमारे अडीचशे वाहने पार्क केली जात असल्याची माहिती सोसायटीचे सचिव संजय गुरव यांनी दिली. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास येथे पार्क केलेल्या वाहनांनी अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी इमारतीखाली धाव घेतली. स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देत आग विझविण्यास सुरुवात केली. या जळीतकांडात तब्बल ३८ दुचाकी आणि दोन कार जळून खाक झाल्या. अनेक बाईक या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क केल्यामुळे आगीच्या झळांमुळे त्याचे किरकोळ नुकसान झाल्याचे येथील स्थानिक किरण जाधव म्हणाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. या कृत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.