लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पर्यटन व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कॉक्स अँड किंग कंपनीने इंडियन बँकेला ३८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कंपनी, तसेच कंपनीच्या ३ संचालकांविरोधात सीबीआयने गुरुवारी गुन्हा दाखल केला.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २७ मे २०१९ रोजी कंपनीने कर्मशिअल पेपरच्या माध्यमातून अलाहाबाद बँकेकडे (अलाहाबाद बँक आता इंडियन बँकेत विलीन झाली आहे) ५० कोटी रुपयांचे ३० दिवसांच्या अल्प मुदतीचे कर्ज मागितले होते. हे कर्ज मंजूरही झाले. नंतर या कर्जापैकी केवळ ११ कोटी रुपयांच्याच कर्जाची परतफेड कंपनीने केली. ३८ कोटी ४६ लाख रुपये बँकेला परत केले नाहीत. तसेच, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने आपल्या ताळेबंदात, तसेच आर्थिक विवरणामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केली.
बनावट पद्धतीने कागदपत्र तयार करून कर्ज मिळविले व थकवले, असा ठपका ठेवत बँकेने सीबीआयकडे लेखी तक्रार केली. त्याची दखल घेत सीबीआयने कंपनीचे संचालक अँथनी गुड, अन्य संचालक अजय केरकर, उर्शिला केरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"