Join us

डेटा एन्ट्रीचे काम घेऊन ३८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:35 AM

विदेशातून काम मिळवून ते लहान कंपन्याना द्यायचे. मात्र त्या कामाचे त्यांना पैसेच द्यायचे नाही, अशी कार्यपद्धती अवलंबून सहा कंपन्यांचे ३८ लाख रुपये लंपास करणाऱ्या बीपीओ चालकाच्या मुसक्या ओशिवरा पोलिसांनी गुरुवारी सकाळी आवळल्या.

मुंबई - विदेशातून काम मिळवून ते लहान कंपन्याना द्यायचे. मात्र त्या कामाचे त्यांना पैसेच द्यायचे नाही, अशी कार्यपद्धती अवलंबून सहा कंपन्यांचे ३८ लाख रुपये लंपास करणाऱ्या बीपीओ चालकाच्या मुसक्या ओशिवरा पोलिसांनी गुरुवारी सकाळी आवळल्या. तीन वर्षांपूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजीव अशोक आहुजा (४०) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने सहा कॉल सेंटर सुरू केली होती. ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहुजा हा विदेशी कंपन्यांकडून डेटा एन्ट्रीची काम घ्यायचा आणि लहान कंपन्यांना द्यायचा. मात्र त्यांनी काम पूर्ण करून दिले की काही ना काही चुका काढायचा. त्यानंतर तेच काम समोरच्या कंपनीला देऊन त्याचे पैसे उचलायचा. या कंपन्या आणि आहुजा यांच्यात मध्यस्थी करणाºया व्यक्तीला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेत आहुजाविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने ओशिवरा पोलिसांना त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याची माहिती विमानतळावरदेखील दिली. आहुजा याचे भारतात येणे, जाणे असल्याने पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. गुरुवारी तो भारतात आल्यावर विमानतळावरच त्याला ताब्यात घेण्यात आले. ओशिवरा पोलिसांनी त्याला अटक करत स्थानिक न्यायालयात हजर केले. त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकरयांनी सांगितले. त्याने ३८ लाखांचा अपहार केल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कॉल सेंटरचा वापर करुन आहुजाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून ते या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.

टॅग्स :गुन्हामुंबई