मुंबई - मुंबईत डासांच्या प्रादुर्भावामुळे दररोज तीन लोकांना डेंग्यूची लागण होत आहे. तसेच गेल्या ३५ महिन्यांत म्हणजेच जवळपास तीन वर्षांमध्ये ३८ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. संध्या ३७ संशयित डेंग्यूचे रूग्ण पालिका रुग्णालयात दाखल झाले आहेत.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षांतील डेंग्यूच्या रूग्णांची आकडेवारी दिली. त्यानुसार २०१६ मध्ये ११८०, २०१७ - ११३४ तर १ जानेवारी २०१८ पासून ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत ९४५ इतके डेंग्युचे रूग्ण होते. तर २०१६ मध्ये ०७ , २०१७ मध्ये १७ आणि ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.
संशयित रुग्णाची संख्या २०१६ मध्ये १३ हजार २१३ , २०१७ मध्ये १२ हजार ९१३ तर ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत १३ हजार १३८ इतकी आहे. म्हणजेच दररोज डेंग्यूचे सरासरी तीन रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या ३५ महिन्यांत प्रत्येक महिन्याला सरासरी एका रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे निदान वेळेत झाल्यास रूग्णाचा जीव वाचविणे शक्य होते. मात्र अनेकवेळा रूग्ण ताप अंगावर काढतात आणि त्यांच्या जीवावर बेतते.