३८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव केला रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 06:37 PM2020-08-08T18:37:03+5:302020-08-08T18:37:26+5:30
तर १५ मंडळांनी विसर्जनाचा कालावधी कमी केला
मनोहर कुंभेजकर
मुंबई : संपूर्ण जग,आपला भारत देश, महाराष्ट्र तसेच आपली लाडकी मुंबापूरी गेली सुमारे पाच महिने कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला करत आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेला उत्सव म्हणजे गणेशोत्सव. संपूर्ण मुंबई या उत्सवात 11 दिवस न्हाहून निघते.तर मुंबई महापालिका दरवर्षी गणेशोत्सवाची जय्यत तयारी करत असते.मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी के पश्चिम वॉर्ड मध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पालिकेला सहकार्य करण्यासाठी सरसावली आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी त्यांचा विसर्जनाचा कालावधी यंदा कमी केला आहे तर सुमारे 50 टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदा गणपती उत्सव साजरा करणार नाही. के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी लोकमतला या शुभवर्तमानाची माहिती दिली.
पर्यावरणाचे रक्षण करून शाडूच्या मातीच्या मूर्त्या,घरगुती आरास व इतर बाबींचा उपयोग करून श्रीगणेशोत्सव साजरा करूया आणि एक प्रभाग एक सार्वजनिक गणपती योजना राबवूया ही संकल्पना राबवण्याचा प्रस्ताव विश्वास मोटे यांनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला होता. त्यांच्या या संकल्पनेला मुंबईसह राज्यात सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. लोकमतने देखिल ऑनलाईन आणि लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
परिमंडळ 4 चे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्या उपस्थितीत आम्ही येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक घेतली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भूमिका मोठी असून पालिका प्रशासनाला त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.पालिकेच्या प्रयत्नांना यश आले असून के पश्चिम वॉर्ड मध्ये आजमितीस 38 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव केला रद्ध तर 15 मंडळांनी विसर्जनाचा कालावधी कमी केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जारी केली आहे. यंदा गणपती आगमन व विसर्जनाला दरवर्षी निघणाऱ्या मिरवणुका निघणार नसल्या तरी गणेशोत्सवात आणि विसर्जनाला होणाऱ्या भक्तांची गर्दी कमी करण्यासाठी के पश्चिम वॉर्डमध्ये गेल्या वर्षी प्रतिष्ठापना केलेल्या 88 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी सध्या तरी 38 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करणार नाही.तर 11 मंडळांनी 10 दिवसांऐवजी दिड दिवस,2 मंडळांनी 5 दिवस तर 2 मंडळांनी 7 दिवस गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे मान्य केल्याची माहिती मोटे यांनी दिली.
सुमारे 6.5 लाख लोकवस्तीच्या या वॉर्ड मध्ये विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हे तीन मोठे विभाग येतात. या वॉर्ड मध्ये सुमारे 100 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा आणि नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हा या वॉर्ड मध्ये येतो.दरवर्षी लाखो गणेशभक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात. तसेच वर्सोवा मेट्रो स्टेशन,मॉडेल टाऊन येथील स्वप्नाक्षय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डी. एन.नगर सार्वजनिक मंडळाचा महागणपती यांच्या दर्शनाला देखिल गणेश भक्तांची दरवर्षी गर्दी होते.तर जुहू चौपाटी,सात बंगला चौपाटी,वेसावे कोळीवाडा येथे गणपती विसर्जनाला गणेश भक्तांची मोठी गर्दी होते.
यावर्षी गणेश मूर्ती ही चार फूटांच्या आतील असल्याने पालिकेतर्फे के पश्चिम वॉर्डमध्ये पुरेशा प्रमाणात कृत्रिम तलाव उभारणार असून पालिकेतर्फे सर्व सुविधा देखिल पुरवण्यात येणार आहे. तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच गणेश मूर्ती स्वीकारणार आहे. त्यामुळे यंदा गणेश भक्तांनी कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन विश्वास मोटे यांनी शेवटी केले आहे.