लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ६७ पैकी ३८ इमारतींकडे महापालिकेचा ‘निवासी दाखला’ (ओसी) नसल्याची माहिती पुन्हा एकदा सिनेट बैठकीत समोर आली आहे. या इमारती नव्या कोऱ्या नसून त्यातील काहींचे बांधकाम १९७५पासून वेळोवेळी झाले आहे. यात ग्रंथालय, शिक्षकांचे निवासगृह, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, उपाहारगृह, आयटी पार्क, मराठी भवन इथपासून ते अगदी परीक्षा भवन आणि आयडॉल इमारतींचा समावेश आहे. ओसी नसल्यामुळे संकुलातील या इमारतींना पाणी, स्वच्छतागृहे, साफसफाई यांसारख्या अनेक सुविधांपासूनही वंचित राहावे लागत आहे. याचा कर्मचारी, विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. विद्यापीठाचा प्रशासकीय विभाग आणि अभियांत्रिकी व स्थापत्य विभाग नेमके काय करत आहेत, असा प्रश्न सिनेट सदस्यांनी सिनेट बैठकीत उपस्थित केला आहे.
सिनेट बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शीतल देवरुखकर शेठ आणि सुधाकर तांबोळी यांनी याबद्दलचा स्थगन प्रस्ताव मांडला. कलिना संकुलात एकूण ६७ इमारती आहेत. आतापर्यंत २४ इमारतींना ओसी मिळाली असून, ३८ इमारतींना ओसी नाही. एका इमारतीला मर्यादित ओसी आहे, तर इतर ४ इमारतींचे काम सुरू असून, त्यांच्या ओसीचे कामही सुरू असल्याची माहिती विद्यापीठाचे रजिस्ट्रार बळीराम गायकवाड यांनी सदस्यांना दिली. ओसी नसलेल्या इमारतींमध्ये लाखो रुपये किमतीचे फर्निचर धूळ खात पडले असून, त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याची माहिती शीतल शेठ यांनी सदस्यांसमोर आणली. नवीन परीक्षा भवनाच्या पहिल्या मजल्यावर पुनर्मूल्यांकन विभाग स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया करण्यात आली. इमारतीमध्ये अनेक ठिकाणी गळतीची समस्या असून, इलेक्ट्रिकल व फायर डक्टच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यासारख्या असुविधांमुळे कर्मचारी नव्या परीक्षा भवनामध्ये जाण्यास अनिच्छा दर्शवत असल्याची माहिती तांबोळी यांनी दिली. इमारतीच्या कार्यालयामधील विविध कामे ही निकृष्ट दर्जाची केलेली असल्याचा मुद्दा सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी मांडला. यासाठी समिती स्थापन करून सदर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी त्यांनी केली.