Join us

प्रोत्साहन भत्त्यापोटी महापालिकेचे ३८३ कोटी खर्च, स्थायी समितीत माहिती सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:47 AM

BMC News : कोविड काळात दिवसरात्र कार्यरत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य व अन्य विभागांतील कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, डॉक्टर यांना दररोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जात होता.

मुंबई : कोविड काळात दिवसरात्र कार्यरत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य व अन्य विभागांतील कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, डॉक्टर यांना दररोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. अशा ९० हजार कर्मचारी - अधिकाऱ्यांना सात महिन्यांच्या कालावधीत ३८३ कोटी रुपये कोरोना भत्ता देण्यात आला. कोरोनाचा संसर्ग  रोखण्यासाठी मुंबईत मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात पालिकेच्या अत्यावश्यक आणि आरोग्य खात्यातील सर्वच कर्मचारी दिवसरात्र कार्यरत होते. या काळात महापालिकेच्या एक लाख दोन हजार कर्मचाऱ्यांपैकी ९० हजार कोरोना योद्धे प्रत्यक्षात मैदानात उतरून काम करत होते; परंतु लोकल सेवा बंद असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी जून ते डिसेंबर २०२०  या सात महिन्यांत दररोज जोखीम  भत्ता स्वरूपात ३०० रुपये देण्यात  येत होते.  या कर्मचाऱ्यांची गैरसाेय टाळण्यासाठी काेराेना संसर्गावेळी लाॅकडाऊन मिळून एकूण    अशा सात महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने ९० हजार कोविड योद्ध्यांना भत्तास्वरूपात दरमहा ७० कोटी देण्यात आले. सात महिन्यांत या स्वरूपात एकूण ३८३ कोटी ८६ लाख ४३ हजार ८२७ रुपये खर्च झाले, अशी माहिती पालिका प्रशासनाने स्थायी समिती बैठकीसमोर सादर केली. ...म्हणून घेतला निर्णय डिसेंबरपर्यंत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले.   सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे कोरोना भत्ता १ जानेवारीपासून बंद करण्यात आला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका