मुंबईतील ३८३ शौचालये धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:05 AM2018-08-05T02:05:26+5:302018-08-05T02:05:38+5:30
मोडकळीस आलेली जुनी सार्वजनिक शौचालये कोसळण्याच्या घटना घडत असल्याने मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालयांची महापालिकेने नुकतीच पाहणी केली.
मुंबई : मोडकळीस आलेली जुनी सार्वजनिक शौचालये कोसळण्याच्या घटना घडत असल्याने मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालयांची महापालिकेने नुकतीच पाहणी केली. मात्र या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये ३८३ शौचालये धोकादायक स्थितीत असून यापैकी काहींची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर आॅक्टोबरपासून शौचालयांच्या दुरुस्तीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
तीन महिन्यांपूर्वी भांडुप येथे सार्वजनिक शौचालय पडून दोन जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालयांच्या आॅडिटची मागणी होत होती. त्यानुसार मुंबईतील सर्व २४ विभागांतील शौचालयांचे स्ट्रक्चरल आॅडिट महापालिकेने केले. संपूर्ण मुंबईतील १,४१५ सार्वजनिक शौचालयांपैकी ९३४ शौचालयांचे आॅडिट करण्यात आले. यामध्ये २४पैकी २० विभागांमध्ये तब्बल ३८३ शौचालये धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. ही शौचालये सी-१ प्रवर्गातील आहेत. त्यामुळे यापैकी काही शौचालये तोडून पुन्हा बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यापैकी १८ सार्वजनिक शौचालयांची मोठ्या स्वरूपात दुरुस्ती केली जाईल. तर १०२ शौचालयांची किरकोळ स्वरूपातील दुरुस्ती करण्यात येईल. या सर्व कामांना आॅक्टोबर २०१८मध्ये सुरुवात होणार असल्याचे समजते.
>आॅडिटमधून चार विभाग वगळले
बी, सी, ई आणि जी-दक्षिण या विभागातील सार्वजनिक शौचालयांचे आॅडिट करण्यात आलेले नाही. यापैकी बी आणि सी विभागांमध्ये एकाही सार्वजनिक शौचालयाची बांधणी करण्यात आलेली नाही. तर जी-दक्षिण विभागात म्हाडाच्या माध्यमातून ६० सार्वजनिक शौचालये बांधलेली आहेत.
>काही दुर्घटना...
२०१५ - मानखुर्दमध्ये महाराष्ट्रनगर येथे साईबाबा चाळीचे शौचालय कोसळून एकाचा मृत्यू.
२०१७ - मानखुर्द मंडलातील इंदिरानगर लोहार चाळीमध्ये शौचालय कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू.
२८ एप्रिल २०१८ - भांडुप टँक रोड येथे एका चाळीतील सार्वजनिक शौचालय कोसळून दोघांचा मृत्यू.
१४१५ - मुंबईतील एकूण सार्वजनिक शौचालये.
९३४ - शौचालयांचे आॅडिट.
३८३ - शौचालये धोकादायक स्थितीत.
५१७० - मुंबईत शौचकूप बांधणे प्रस्तावित
१६९० - शौचकूप बांधून पूर्ण.
१८२० - शौचकूप बांधणीचे काम प्रगतिपथावर
१०३५ - नवीन शौचकूपांचे काम हाती घेण्यात आले आहे.
विभाग धोकादायक
शौचालये
एम पश्चिम (गोवंडी, मानखुर्द) १५८
एन विभाग (घाटकोपर) ७०
एस विभाग (भांडुप) ४९
डी विभाग(ग्रँट रोड) २६