महापालिका दवाखान्यात ३८८ मानसिक रुग्ण; महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:39 PM2023-10-10T14:39:47+5:302023-10-10T14:40:51+5:30
या दवाखान्यात एप्रिलपासून आतापर्यंत नवीन २ हजार ४७१ संशयित मानसिक रुग्णांची नोंद झालेली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणारे एप्रिल महिन्यात १९० दवाखाने व १३५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू करण्यात आले. त्यामध्ये मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने ज्या तपासण्या केल्या गेल्या त्यामध्ये ३८८ मानसिक रुग्ण आढळून आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
या दवाखान्यात एप्रिलपासून आतापर्यंत नवीन २ हजार ४७१ संशयित मानसिक रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी ३४७ सौम्य आणि ४१ गंभीर स्वरूपाचे रुग्ण आढळले. एकूण २११ रुग्णांना पुढील उपचाराकरिता महानगरपालिका रुग्णालयांमध्ये संदर्भित केले गेले. तर १ हजार ४०० रुग्णांचे समुपदेशन व पाठपुरावा करण्यात आला. याकरिता या दवाखान्यातील ४६२ वैद्यकीय अधिकारी यांना मानसिक आरोग्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या के.ई.एम./ रुग्णालयाअंतर्गत मानसोपचार विभागामार्फत २४ तास हितगुज हेल्पलाइन (जगण्याची नवी उमेद) ही सेवा २४१३-१२१२ या क्रमांकावर कार्यरत आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. मानसिक आजारामुळे माणसांचे विचार, वर्तन आणि भावनिक नियंत्रण यामध्ये अडथळे येतात. विचारांचा आणि भावनांचा योग्य मेळ न बसल्याने मानसिक संतुलन बिघडते; तसेच योग्य वेळेत उपचार झाल्यास मानसिक आजारांवर नियंत्रण येते. समाजात मानसिक रुग्ण हा लोकांच्या हेटाळणीचा विषय असल्याने हे रुग्ण मानसिक आजाराबद्दल सल्ला व उपचार घेण्यास दिरंगाई करतात.
निरोगी शरीरासोबत उत्तम मानसिक आरोग्याची गरज असते. जगभरात मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार इतर आजारांच्या तुलनेत मानसिक आजाराचे प्रमाण १४ टक्के आहे. जगात दर ८ पैकी एक व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने मानसिक आजारांवरील उपचारांना देखील प्राधान्य दिले जात आहे.
- डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते