भायखळा कारागृहातील ३९ जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:06 AM2021-09-27T04:06:23+5:302021-09-27T04:06:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कारागृहातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण येत असताना भायखळा येथील महिला कारागृहात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. ...

39 inmates of Byculla jail hit by corona | भायखळा कारागृहातील ३९ जणांना कोरोनाची बाधा

भायखळा कारागृहातील ३९ जणांना कोरोनाची बाधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कारागृहातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण येत असताना भायखळा येथील महिला कारागृहात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. गेल्या १० दिवसांत ६ मुलांसह ३९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. यापैकी ३६ जणांना जवळच असणाऱ्या एका शाळेत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर वरिष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भायखळा येथील महिला कारागृहात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर सर्व कैद्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे. त्यांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अन्य कारागृहांतही कैद्यांच्या तपासणीवर भर देत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचे संक्रमण नेमके कसे झाले याबाबत कारागृह प्रशासन अधिक तपास करत आहेत. भायखळा महिला कारागृहात २६२ कैद्यांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहेत. त्यामुळे यावर वेळीच रोख आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर राज्यभरातील कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यात एप्रिलपर्यंत ९ कैदी आणि ८ कारागृह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृह असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृह, एक महिला, तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे.

Web Title: 39 inmates of Byculla jail hit by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.