Join us

नायजेरियन नागरिकाकडून ३९ लाखांचे कोकेन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने एका नायजेरियन नागरिकाला मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ अटक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने एका नायजेरियन नागरिकाला मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ अटक केली. १३० ग्रॅम कोकेन जप्त केले. चिमा कॉलिंन्स इजीओफोर उर्फ मुसिली (वय ६०) असे त्याचे आहे. त्याच्याकडे मिळालेल्या कोकेनची किंमत ३९ लाख असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

एएनसीच्या वरळीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मुसिली हा नायजेरियन असला तरी दिल्लीत वास्तव्याला होता. तेथून तो मुंबई व उपनगरात अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवित होता, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे, प्रभारी निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले.

अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत पथकाकडून गस्त सुरू होती. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मुंबई सेंट्रल स्टेशन ब्रिजच्या परिसरातील फुटपाथवर मुसिलीला संशयास्पदरीत्या फिरत असताना एपीआय सुदर्शन चव्हाण, उपनिरीक्षक अमोल कोळेकर, रवींद्र सावंत, हवालदार दिलीप जगदाळे आदींनी पकडले.

त्याची झडती घेतली असता १३० ग्रॅम कोकेन मिळाले. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या ड्रग्ज रॅकेटचा व त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.