मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने या काळात आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत जुलै महिन्यात तब्बल २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जून याकाळात १७ हजार ७१५ अशा एकूण ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात.
एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यापैकी सुमारे १७ हजार ७१५ जणांना रोजगार मिळाला. त्यानंतर जुलै महिन्यात ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये मुंबई विभागात १२ हजार १५१, नाशिक विभागात ०८ हजार ५२६, पुणे विभागात २२ हजार २६०, औरंगाबाद विभागात ६ हजार २७५, अमरावती विभागात ०३ हजार ३६६ तर नागपूर विभागात ०५ हजार ५७९ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये २१ हजार ५७२ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले आहे. मुंबई विभागातील ३ हजार ९४०, नाशिक विभागातील १ हजार ३२१, पुणे विभागातील १४ हजार ५२१, औरंगाबाद विभागातील १ हजार १०५, अमरावती विभागातील ४१४ तर नागपूर विभागातील २७१ उमेदवार नोकरीस लागले आहेत.