बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे ३९ वर्षीय व्यक्तीला नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:13 AM2020-10-06T01:13:36+5:302020-10-06T01:13:39+5:30

रक्ताच्या कर्करोगाचे झाले होते निदान; भावाकडून मिळाला बोनमॅरो, एकमेव होता पर्याय, यशस्वी शस्त्रक्रिया

A 39-year-old man has been resuscitated by a bone marrow transplant | बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे ३९ वर्षीय व्यक्तीला नवसंजीवनी

बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे ३९ वर्षीय व्यक्तीला नवसंजीवनी

Next

मुंबई : मुंबईतील ३९ वर्षीय श्रीकांत महाडिक गेल्या काही महिन्यांपासून त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. प्रकृती अधिकच खालावू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना परळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय चाचण्यांअंती ल्यूकेमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि त्वरित बोनमॅरो प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय शिल्लक असताना रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार हेमॅटोलॉजी डॉ. अभय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी प्रत्यारोपण करत रुग्णाला जीवनदान दिले आहे.

रक्ताचा कर्करोग असलेल्या रुग्णाच्या शरीरात रक्त कमी होते. प्लेटलेट्सच्या संख्येत झपाट्याने घट होते व हाडे दुर्बल होतात. यासंदर्भात माहिती देताना कन्सल्टंट हेमॅटोलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. श्रीनाथ क्षीरसागर म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात या रुग्णाला ल्यूकेमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. हा रुग्ण उपचारांसाठी आल्यानंतर त्याला किमोथेरपी सुरू करण्यात आली. परंतु मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने कोरोना रुग्णांमुळे बरीच रुग्णालये बंद पडली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया रखडली होती.

डॉ. क्षीरसागर म्हणाले, या आजारात शरीरातील रक्तपेशींवर कर्करोगाच्या पेशी हल्ला चढवतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊ लागतात. अशा स्थितीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन सर्दी, ताप व न्यूमोनियासारखे संसर्गजन्य आजार होतात. या रुग्णालाही कोविड-१९ची लागण झाली होती. त्यामुळे कुटुंबीयांच्या चिंतेत अजूनच वाढ झाली होती. परंतु, दोन आठवडे योग्य उपचारांनंतर त्यांनी कोरोनावर मात केली. जुलै महिन्यात प्रकृती खालावू लागल्याने डॉक्टरांनी रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी बोनमॅरो प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. रक्ताच्या काही विशिष्ट आजारांमध्ये रुग्णाला बोनमॅरो प्रत्यारोपण करावे लागते. हे रक्तातील मूळ पेशींचे रोपण असते.

रुग्णाच्या भावाकडून बोनमॅरो घेऊन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Web Title: A 39-year-old man has been resuscitated by a bone marrow transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.