Join us

Kandivali Vaccination: कांदिवली बनावट लस प्रकरणातील ३९० लाभार्थ्यांना उद्या खरी लस मिळणार; पालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 10:52 PM

Corona Vaccine for Kandivali vaccination scam people: कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगी केंद्रामार्फत ३० मे रोजी लसीकरण आयोजित केले होते. मात्र, हे लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कांदिवली (पश्चिम) येथील हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी केंद्रामार्फत झालेले लसीकरण बोगस असल्याचे उजडात आले होते. या प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांना अखेर लस देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी कांदिवलीतील लसीकरण केंद्रांवर ३९० लाभार्थ्यांना लस मिळणार आहे. (kandivali vaccination scam people get original Vaccine on Saturday,)

कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगी केंद्रामार्फत ३० मे रोजी लसीकरण आयोजित केले होते. मात्र, हे लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलीसांनी चौकशी देखील सुरु केली. या चौकशीत अशाच प्रकार एकूण नऊ बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे समोर आले.

लसीकरणाचे अशा बोगस प्रकरणांमध्ये शेकडो नागरिकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. या नागरिकांना लस ऐवजी ग्लुकोजचे पाणी चढवण्यात आले.  सदर लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचे देखील निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारची पोलिसांमार्फत सखोल चौकशी सुरू आहे.

येथे मिळणार लस...

कांदिवली (पश्चिम) मध्ये महावीर नगर परिसरातील ऍमिनिटी मार्केट महानगरपालिका लसीकरण केंद्रावर सत्र आयोजित करण्यात आले आहे. येथे शनिवारी सकाळी ३९० लाभार्थ्यांना लस मिळणार आहे. दरम्यान, मुंबईत आढळलेल्या नऊ बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलिसांकडून महापालिकेला मिळाली आहे. या नागरिकांना अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करुन कार्यवाही सुरु असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अशी मिळणार लस..

पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पालिकेला मिळाली आहे. त्यानुसार कोविन संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती  पडताळण्यात येत आहे. खरी लस मिळालेल्या नागरिकांना नियमानुसार कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस देण्यात येईल. तर, ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य कार्यवाही करुन अधिकृत लस देण्यात येणार आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई