३,९०० जणांनी थकवला २,२०० कोटींचा कर; पालिकेपुढे वसुलीचे मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:20 AM2024-02-28T10:20:58+5:302024-02-28T10:23:14+5:30
तब्बल ३९०० मुंबईकरांकडून त्या आधीच्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल होणे बाकी आहे.
मुंबई : अखेर मालमत्ता कराची बिले पाठवण्यास मुंबई महापालिकेला मुहूर्त मिळाला असला तरी तब्बल ३९०० मुंबईकरांकडून त्या आधीच्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. थकबाकीची ही रक्कम २२० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या थकबाकीदारांकडून वसुली करण्यात पालिकेला यश मिळते की नाही, याविषयी उत्सुकता आहे. थकीत रकमेविषयी या मंडळींना पालिकेने कळवले आहे.
मालमत्ता कराची बिले पाठवण्यास पालिकेने सोमवारपासून सुरुवात केली आहे. मार्च २०२४ पर्यंत थकबाकी न भरल्यास दोन टक्के व्याज आकारले जाणार आहे. २०२३-२४ या वर्षातील मालमत्ता करातून ४५०० कोटी रुपये वसूल करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७०८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मार्चमध्ये आर्थिक वर्ष समाप्त आहे. त्यामुळे वसुलीचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे. मात्र मागील तीन वर्षांत सुधारणा झालेली नाही. साहजिकच मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न वाढलेले नाही.
१५०० कोटी इतकी घट :
थकबाकी वसुलीवर खल सुरू आहे. काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत, तर काही बाबींवर कायद्यात सुधारणा अभिप्रेत आहे. त्याआधी २०२२-२३ या वर्षात ४९९४. ५ कोटी रुपये उप्तन्न मालमत्ता करातून प्राप्त झाले आहे. २०२३-२४ या वर्षात मालमत्ता करापोटी सहा हजार कोटी इतके उत्पन्न अंदाजित होते. ते ४५०० कोटी असे सुधारित करण्यात आले आहे.