लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई-अहमदाबादबुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे बीकेसी ते शिळफाटादरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. २६ मीटर खोल झुकलेल्या ‘एडीआयटी’मुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम)द्वारे ३.३ किमी बोगद्याचे बांधकाम सुलभ होईल. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी १.६ मीटर बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल. बोगद्याच्या २१ किमी बांधकामापैकी १६ किमी टनेल बोरिंग मशीनद्वारे, तर उर्वरित पाच किमी ‘एनएटीएम’द्वारे आहे.
६ डिसेंबर २०२३ रोजी ‘एडीआयटी’साठी खोदकाम सुरू करण्यात आले. ३९४ मीटर लांब संपूर्ण बोगदा सहा महिन्यांमध्ये खोदण्यात आला. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली २७ हजार ५१५ किलो स्फोटकांचा वापर करून एकूण २१४ नियंत्रित स्फोट करण्यात आले. सुरक्षित उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला. उत्खनन (बोगदा) करताना आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तू सुरक्षित राहाव्यात यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे.